धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 10:07 AM2024-11-10T10:07:38+5:302024-11-10T10:07:58+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या दाेघांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे / उल्हासनगर : निवडणूक काळात रोख रक्कम व दारू जप्तीसाठी सुरू केलेल्या चेकपोस्टवर पकडल्या जाणाऱ्या रोकडीची अफरातफर केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे जप्त केलेल्या रकमेची अफरातफर केल्याबद्दल भरारी पथकांच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले.
म्हारळगाव नाका चाैक येथे उल्हासनगरमध्ये भरारी पथक क्र. ३ चे प्रमुख संकेत चानपूर व भरारी पथक क्र.६ चे प्रमुख संदीप शिरस्वाल यांच्या संयुक्त कारवाईत फुले विक्रीचे ७ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यामधील ८५ हजारांची अफरातफर केल्याबद्दल दाेघांना उल्हासनगर महापालिकेने निलंबित केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या दाेघांना निवडणूक कामातून कार्यमुक्त केले.
झेंडू व शेवंतीच्या फुलांची विक्री करून ७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी फूल व्यापारी भांडुपचे बबन आमले व त्यांचा मित्र नितीन शिंदे मुंबईहून कल्याण मार्गे मुरबाडच्या दिशेने जात हाेते. त्यांच्या गाडीची तपासणी भरारी पथकप्रमुखांनी केली असता त्यात ही रक्कम आढळून आली. फूल खरेदी, विक्रीच्या मालाच्या पावत्या त्यांनी संदीप शिरस्वाल यांना दाखविल्या; परंतु त्यास न जुमानता त्यांनी ही रक्कम जप्त केली. दुसऱ्या दिवशी जप्तीच्या रकमेतून ८५ हजार रुपये काढून घेऊन उर्वरित रक्कम परत केली. आमले यांनी तक्रार दाखल केली होती.