धक्कादायक! ठाण्यात मुलीला मारहाण केल्याच्या रागातून जावयाला सासऱ्यानेही केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 07:59 PM2020-05-04T19:59:00+5:302020-05-04T20:02:27+5:30
आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सहन न झाल्याने अनिरुद्ध गलगली या जावयालाही त्याचे सासरे विनोद शर्मा, भाऊ नंदन शर्मा आणि भावाचा मित्र गौरव सिंग अशा तिघांनी मारहाण केली. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आपल्या सास-यासह तिघांविरुद्ध रविवारी तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्या मुलीला जावयाने बेदम मारहाण केल्याच्या रागातून अनिरुद्ध गलगली (३४) या तिच्या पतीलाही सासरे, मेव्हणे आणि त्याचा मित्र अशा तिघांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन्ही पती पत्नींनी एकमेकांविरुद्ध मारहाण तसेच धमकीची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणारी नेहा (३५) आणि वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करणारा तिचा (३४, रा. दोस्ती इम्पेरिया, मानपाडा, ठाणे) या पती पत्नींमध्ये गेल्या तीन वर्षांपासून घरगुती कारणांवरुन वाद आहेत. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. नेहमीप्रमाणेच त्यांच्यात रविवारी दुपारीही वाद झाला. याच वादातून दोघांनीही ३ मे रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकमेकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकीच्या तक्रारी दिल्या. पती बरोबर भांडण झाल्याचे आणि त्याने मारहाण केल्याची बाब नेहाने तिच्या वडिलांना फोनवरुन सांगितली. याचाच जाब विचारण्यासाठी तिचे वडिल विनोद शर्मा, भाऊ नंदन शर्मा आणि भावाचा मित्र गौरव सिंग हे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी पोहचले. त्यावेळी पती पत्नी नेहाला मारहाण करीत असल्याचे दृश्य त्यांना पहायला मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात त्यालाही हाताच्या ठोशा बुक्क्यांनी अनिरुद्ध गलगली याला किचनमधील स्टीलचे पातेले, ग्लास या भांडयांनी मारहाण करीत त्याला जखमी केले. त्याला शिवीगाळ करुन त्याला पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याने ३ एप्रिल रोजी रात्री चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
* अनिरुद्धने सासरच्या मंडळींनी मारहाण केल्यानंतर चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप करीत आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने ट्वीटरवरुन ‘सेव्ह अनिरुद्ध हॅश टॅग’ ही मोहीमही सुरु केली होती. मात्र, दोन्ही बाजूंची पडताळणी करीत याप्रकरणी कारवाई केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले.