धक्कादायक! मोबाईल हिसकावल्याने महिला प्रवाशाचा मृत्यु: चोरटा अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:07 AM2021-06-01T00:07:09+5:302021-06-01T00:11:00+5:30
चालत्या रेल्वेमध्ये मोबाईल खेचून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यु झाला होता. या प्रकरणात फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) या सराईत चोरटयाला ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चालत्या रेल्वेमध्ये मोबाईल खेचून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटयाला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात विद्या ज्ञानेश्वर पाटील (३५) या महिलेचा शनिवारी कळवा स्थानकाजवळ मृत्यु झाला होता. या प्रकरणात फैजल शेख (३१, रा. मुंब्रा) या सराईत चोरटयाला ठाणे रेल्वे पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्याला ४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने दिले आहेत.
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या विद्या या २९ मे रोजी अंधेरी येथून उपनगरी रेल्वेने घरी परतत होत्या. ही रेल्वे रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकात आली. या स्थानकातून रेल्वे पुढे जात असतांनाच आधीच धबा धरुन बसलेला एक चोरटा रेल्वेत शिरला. त्याने विद्या यांच्याशी झटापट करीत त्यांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर तो खाली उतरला. त्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन त्या खाली उतरल्या. परंतू, तोपर्यंत फलाट संपला. त्यामुळे त्या थेट रेल्वेतून खाली कोसळल्या. यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यु असल्याचे रेल्वे पोलिसांना वाटले. परंतू, याच डब्यातील एका महिला प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे हा जबरी चोरीचा प्रकार समोर आला. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास डोळे आणि दिनेश कुलकर्णी आदींच्या पथकाने सीसीटीव्ही आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फैजल या सराईत गुन्हेगाराला मुंब्य्रातून अटक केली. त्याच्यावर यापूर्वी २१ गुन्हयांची नोंद आहे.
* पाच दिवसांपूर्वीच सुटला जामीनावर-
रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला फैजल हा २५ मे रोजी न्यायालयातून १५ हजारांच्या जामीनावर सुटला होता. त्याला तीन महिन्यांपूर्वी ठाणे रेल्वे पोलिसांनी अशाच एका जबरी चोरीमध्ये अटक केली होती.
* तीन मुली झाल्या आईला पोरक्या-
एका खासगी आयात निर्यात करणाºया कंपनीमध्ये विद्या पाटील या नोकरीला होत्या. त्या दररोज डोंबिवली ते अंधेरी रेल्वेने प्रवास करीत होत्या. त्यांना सहा वर्षीय, चार वर्षीय आणि एक तीन महिन्यांची अशा तीन मुली आहेत. केवळ एका मोबाईल चोरटयामुळे या मुलींना आपल्या आईला मुकावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.