धक्कादायक! ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी खटला दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:40 PM2020-07-15T23:40:29+5:302020-07-15T23:44:13+5:30
पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये पर्यायी ठिकाणचे भाडे न देणे तसेच ४० सभासदांना प्रत्येकी अडीच लाखांची कॉर्पस फंडाची रक्कम न देता पुनर्विकास कराराच्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा खटला नुकताच दाखल झाला आहे. जूनअखेरीस सोसायटीला या बिल्डरकडून तीन कोटी २४ लाख २७ हजार ७६९ रुपयांचे देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इमारतीच्या मूळ रहिवाशांना पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये पर्यायी ठिकाणचे भाडे न देणे तसेच प्रत्येकी अडीच लाखांची कॉर्पस फंडाची रक्कम ४० सभासदांना न देता पुनर्विकास कराराच्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा खटला नुकताच दाखल केला आहे. यामध्ये विकासकाने जून २०२० अखेरपर्यंत तब्बल तीन कोटी २४ लाखांची रक्कम थकविल्याचीही माहिती रहिवाशांनी ठाणेन्यायालयात दिली आहे. वर्तकनगर येथील एकता सोसायटी बिल्डिंग क्रमांक १८ च्या रहिवाशांनी भारतीय दंड संहिता कलम ४१८, ४२३, ४२७, ४०६ आणि ४२० नुसार ही तक्रार न्यायालयात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पुराणिक बिल्डर्सच्या फॉर्च्युन इन्फ्राक्रेटर्स प्रायव्हेट लि.च्या शैेलेश पुराणिक, श्रीकांत पुराणिक, योगेश पुराणिक आणि निलेश पुराणिक तसेच त्यांच्या कंपनीविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कथित आरोपींनी इमारत क्रमांक १८ च्या सोसायटीबरोबर नोंदणीकृत जो करारनामा ३० जून २०१६ रोजी केला होता, त्याच्या अटींचा भंग केला आहे. पुराणिक यांनी गेले वर्षभर रहिवाशांचे पर्यायी जागेचे भाडे दिलेले नाही. तसेच कॉर्पस फंड म्हणून प्रत्येकी दोन लाख ५० हजारांची रक्कमही दिली नाही. याशिवाय, सोसायटीतील रहिवाशांसोबत वैयक्तिक करार केला नाही. सोसायटीबरोबर जो करार झाला, त्यातील अटीनुसार विकासकांनी त्यांच्या सदनिका कर्ज घेतेवेळी गहाण ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही, त्या गहाण ठेवल्या आहेत. याशिवाय, इतरही अटींचा भंग केल्याने सोसायटीने एकूण १६ पत्रे तसेच वकिलांमार्फतीने चार नोटिसाही दिल्या आहेत. यापैकी कशाचेही उत्तर देण्यात आले नाही. सोसायटीचे वयस्कर पदाधिकारी विकासकाच्या कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांच्या मार्फतीने हाकलून भेट नाकारली जाते, असे आरोप केले आहेत. आता रहिवासी वास्तव्याला असलेल्या ठिकाणचे भाडे थकल्याने पर्यायी जागाही सोडावी लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये काहींनी आपले मूळ गाव गाठले आहे. तर, काही बदलापूरसारख्या ठिकाणी वास्तव्याला गेले. जूनअखेरीस कथित आरोपींनी या सोसायटीला तीन कोटी २४ लाख २७ हजार ७६९ रुपये इतके देणे आहे. कोविडमध्ये मिशन बिगिनअंतर्गत राज्य शासनाने बांधकामास परवानगी दिली आहे. तरीही, या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सध्या बंद आहे.
या फसवणुकीची केस १ जुलै २०२० रोजी ठाणे न्यायालयात सोसायटीतर्फे अॅड. प्रशांत पंचाक्षरी यांनी दाखल केली. न्यायाधीश इंगळे यांनी या खटल्याच्या सुनावणीसाठी २७ जुलै २०२० रोजीची तारीख फिर्यादी यांच्या साक्षीसाठी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात पुराणिक बिल्डर्सचे शैलेश पुराणिक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
‘‘यासंदर्भात पुराणिक बिल्डर्सविरुद्ध इमारत क्रमांक १८ च्या वतीने ठाणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. विकासकाकडे तीन कोटी २४ लाख २७ हजार ७६९ रुपयांची थकबाकी आहे. तसेच पुनर्विकास कराराच्या अनेक अटींचा भंग केल्याने हा खटला न्यायालयात दाखल केला आहे.’’
अॅड. प्रशांत पंचाक्षरी, ठाणे