धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:46 AM2020-07-22T00:46:25+5:302020-07-22T00:50:28+5:30
विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या भामट्यांनी एका खासगी विमा कंपनीचे बनावट ईमेलद्वारे तक्र ारदार ठाण्याच्या पाचपाखाडीतील महिलेशी संपर्क केला. या महिलेला एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे भरणा करण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर विमा कंपनीमध्ये संबंधित भामट्यांनी त्यांचे हे पैसे भरलेच नाही. या महिलेने काही महिन्यांपूर्वी भारती एक्स या कंपनीसह इतर कंपन्यांमध्ये पाच पॉलिसी घेतल्या होत्या. दरम्यान, २१ जून २०२० रोजी या महिलेला सुमित आहुजा नावाच्या व्यक्तीचा इमेल आला. तुमच्या पॉलिसीच्या प्लॅनमध्ये दिशाभूल झाली असल्याचे या मेलमध्ये दर्शविण्यात आले होते. त्यानंतर या ईमेलमध्ये दिलेल्या फोन क्रमांकावर या महिलेने फोनद्वारे विचारणा केली, तेव्हा या व्यक्तीने भारती एक्स कंपनीच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचा दावा केला. तुमच्या जुन्या पॉलिसीऐवजी नविन पॉलिसी घेतली आहे. त्या पॉलिसीचा कालावधी वाढविला तर तुम्हाला लगेचच मोठा फायदा होऊ शकतो, असेही त्याने पटवून दिले. त्यानंतर या महिलेशी त्याने वारंवार फोनद्वारे संपर्क करुन त्यांना एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे विविध बँकांत १७ लाख रुपये भरणा करण्यास भाग पाडले. मात्र, भरणा केलेली रक्कम संबंधित विमा कंपनीस प्राप्त झाली नसल्याची बाब समोर आली. हा सर्व प्रकार २१ जून ते १६ जुलै २०२० या कालावधीत घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.