धक्कादायक! सावत्र आईचा खून करुन नऊ वर्षे फरारी आरोपीला अखेर ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:00 AM2020-11-07T00:00:59+5:302020-11-07T00:03:23+5:30
मालमत्तेच्या वादातून सख्या आईला त्रास देणाऱ्या सावत्र आईचा रागाच्या भरात खून करुन पसार झालेल्या सलीम लुतफर मोल्ला (३२) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला लवकरच पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वडिलांनी दुसरा विवाह केल्यानंतर मालमत्तेच्या वादातून सख्या आईला त्रास देणाºया सावत्र आईचा रागाच्या भरात खून करुन पसार झालेल्या सलीम लुतफर मोल्ला (३२, रा. पवनकाठी, पश्चिम बंगाल) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर परगाना जिल्हयातील स्वरुपनगर पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी ठाण्याच्या जांभळी नाका येथील गणेश मंदिराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधाारे सरक यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, संभाजी मोरे, आबुतालीब शेख, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक अजय साबळे आणि दादा पाटील आदींच्या पथकाने ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सलीम याला सापळा रचून ताब्यात घेतले. वडिलांनी दुसरा विवाह केल्यानंतर सावत्र आई हक्क गाजविण्यासाठी तसेच मालमत्तेचा मोठा हिस्सा मिळण्यासाठी आपल्यासह सख्या आईचा छळ करीत होती. तिच्या या सततच्या छळाला कंटाळून अखेर रागाच्या भरात तिचा २०११ मध्ये खून केल्याची कबूली सलीमने पोलिसांना दिली. खूनानंतर तो भिवंडीतील काल्हेर येथे वास्तव्य करीत होता. त्याला लवकरच पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.