धक्कादायक! पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात बालिकेचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:24 PM2021-03-15T22:24:26+5:302021-03-15T22:25:43+5:30
पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद पोलिसांनी केली आहे.
घोडबंदर रोड येथील डेफोडील सोसायटीमधील रहिवाशी राजू पालशेतकर यांच्या घरी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. हे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर राजू यांची पत्नी आणि मुलगी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरात गेले. त्यावेळी पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे १४ मार्च रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ऋत्वी हिला उलटी झाली. तर त्यांच्या पत्नीला मळमळ सुरु झाली. त्यामुळे दोघींनाही तात्काळ त्यांनी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ऋत्वी हिचा रविवारी सायंकाळी मृत्यु झाल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. फड हे अधिक तपास करीत आहेत.