धक्कादायक! मित्राचा खून करुन मृतदेह कुत्र्याचा असल्याची ‘त्याने’ केली रिक्षा चालकाला बतावणी
By जितेंद्र कालेकर | Published: September 8, 2020 10:57 PM2020-09-08T22:57:49+5:302020-09-08T23:06:18+5:30
धक्कादायक बाब म्हणजे या खूनानंतर गोणीत मृतदेह भरुन तो कुत्र्याचा असल्याचे त्याने रिक्षा चालकाला भासविले. नंतर रिक्षाने हा मृतदेह वसई खाडीकडे नेऊन पूलावरुन ती गोणीच खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पूर्ववैमनस्यातून अक्षय हेमंत डाकी (२०, रा. वाघबीळ, ठाणे) या तरुणाचा खून करणा-या धनराज तरुडे (३०) या त्याच्याच मित्राला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खूनानंतर गोणीत मृतदेह भरुन तो कुत्र्याचा असल्याचे त्याने रिक्षा चालकाला भासविले. नंतर रिक्षाने हा मृतदेह वसई खाडीकडे नेऊन पूलावरुन ती गोणीच खाडीत फेकून दिल्याची बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोड वाघबीळ येथील रहिवाशी हेमंत डाकी (४५) या रिक्षा चालकाने त्यांचा मुलगा अक्षय याच्या खून आणि अपहरण तसेच खूनाचा पुरावा नष्ट केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी दाखल केली होती. या तक्रारीनुसार अक्षय याला घोडबंदर रोडवरील पानखंडा परिसरात अपहरण करुन नेले. नंतर त्याच्यावर हत्याराने वार करुन त्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरुन वसई खाडी येथील ब्रिजवरुन खाडीच्या पाण्यात टाकून दिला. हा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धनराजला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याने हा खून नेमकी कोणत्या कारणासाठी केला? कशा प्रकारे केला? या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुत्र्याचा मृतदेह असल्याचा रिक्षा चालकाकडे केला बहाणा
अक्षयच्या खूनानंतर त्याचा मृतदेह कथित आरोपी धनराज याने एका गोणीत भरला. या गोणीमध्ये कुत्र्याचा मृतदेह असून ते खाडीत टाकायचे असल्याचे एका रिक्षा चालकाला त्याने सांगितले. त्याच रिक्षाने हा मृतदेह त्याने वसई खाडीकडे नेला. नंतर तिथून तो खाडीत फेकून दिला. ही माहिती रिक्षा चालकाकडून पोलिसांना मिळाल्यानंतर खून करणा-या धनराजनेही या खूनाची कबूली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. खाडीत मृतदेह फेकला त्यावेळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे हा मृतदेह मंगळवारी उशिरापर्यंत हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.