धक्कादायक! आई वडिलांपासून वेगळे राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीचा खून करुन पतीचीही आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:51 PM2021-02-18T20:51:16+5:302021-02-19T21:10:11+5:30
सासू सासऱ्यांपासून (पतीच्या आई वडिलांपासून) वेगळे राहण्याची मागणी करणाºया पत्नी अश्विनी (१८) हिचा निर्घृण खून करुन आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या पतीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठाणे : सासू सासऱ्यांपासून (पतीच्या आई वडिलांपासून) वेगळे राहण्याची मागणी करणाºया पत्नी अश्विनी (१८) हिचा निर्घृण खून करुन आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या पतीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी मृत आकाश याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाºया खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू सासºयांबरोबर होणाºया भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी पती आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटूंब पद्धतीने वास्तव्य करीत होते. मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजीत शिरसाठ या नातेवाईकाच्या घरी जात होते. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्दयावरुन वाद झाला. दुसºया दिवशी १७ फेबु्रवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये घरातच लटकलेला आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी ही देखिल घरातच रक्ताच्या थारोळयात पडलेली आढळली. जवळच एक लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोडयाने प्रहार केल्याचे आढळले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. आकाश विरुद्ध पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बजबळे यांनी सांगितले.