दिवसाढवळ्या दुकानात घुसून सोनाराची निर्घृण हत्या; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:09 PM2021-08-21T19:09:21+5:302021-08-21T19:10:35+5:30

घटनेनंतर नालासोपारा शहरातील ज्वेलर्सनी दुकाने बंद करून निषेध दर्शवत हॉस्पिटल आणि घटनास्थळी गर्दी केली होती. जोपर्यंत आरोपी पकडले जाणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ज्वेलर्स मालकांनी घेतला होता.

Shocking incident in Nalasopara goldsmith brutal murder by thief into a shop | दिवसाढवळ्या दुकानात घुसून सोनाराची निर्घृण हत्या; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

दिवसाढवळ्या दुकानात घुसून सोनाराची निर्घृण हत्या; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext


नालासोपारा : पश्चिमेकडील एसटी डेपो रोडवरील ज्वेलर्स दुकानात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन आरोपींनी शनिवारी दिवसाढवळ्या ४५ वर्षीय सोनाराची हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर नालासोपारा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांच्या अनेक टीम हजर झाल्या. सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींबाबत काही पुरावा मिळतो का याचा तपास सुरू आहे. नालासोपारा पोलिसांनी दरोडा आणि हत्या या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो रोडवरील इमारतीमध्ये किशोर जैन (४५) यांच्या मालकीचे साक्षी ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते एक मुलगी आणि पत्नीसह दुकानाच्या समोरील इंद्रप्रस्थ इमारतीमध्ये राहतात. ते नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी घरातून आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लॉकर रूममध्ये असताना दोन आरोपी दुकानात आले. यानंतर आरोपींनी दुकानात अर्धा तास सोने लुटण्याचा प्रयत्न केला. पण किशोर यांनी त्यांना विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्या डोक्यात, मानेवर, अंगावर धारदार हत्याराने ८ ते १० वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर दोन्ही आरोपी नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे चालत गेले. जखमी ज्वेलर्स मालकाला आजूबाजूच्या लोकांनी अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. घटनेनंतर नालासोपारा पोलीस, घटनास्थळी पोहोचले. या दोन्ही चोरांनी किती सोने चोरून नेले हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

घटनेनंतर नालासोपारा शहरातील ज्वेलर्सनी दुकाने बंद करून निषेध दर्शवत हॉस्पिटल आणि घटनास्थळी गर्दी केली होती. जोपर्यंत आरोपी पकडले जाणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ज्वेलर्स मालकांनी घेतला होता.

चोरीच्या उद्देशाने दोन आरोपींनी दुकानात येऊन ज्वेलर्स मालकांवर धारदार हत्याराने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: Shocking incident in Nalasopara goldsmith brutal murder by thief into a shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.