धक्कादायक! नाकाबंदी चुकविण्यासाठी परप्रांतीयांची चक्क नाल्यातून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:24 AM2020-05-11T02:24:51+5:302020-05-11T02:36:13+5:30
नाकाबंदी चुकविण्यासाठी परप्रांतीय मजूरांनी कुटूंबीयांसह एका ठाण्यातील एका नाल्यातून प्रवास केला. याचीच राज्य शासनाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार पोलिसांनी या परप्रातीयांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सोडले. आणखी काही बसेसमधून या परप्रांतीयांना लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: परराज्यातील मजूरांनी पोलिसांची नाकाबंदी चुकविण्यासाठी चक्क ठाण्यातील आनंदनगर टोलनाका येथील नाल्यातून पायपीट करीत गावचा रस्ता धरल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मजुरांना ताब्यात घेऊन तीन बसमधून मध्यप्रदेशच्या सीमेवर कोपरी पोलिसांनी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरी, आनंदनगर टोलनाक्यावरून पुढे पोलीस अडवित असल्यामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास पूर्व दू्रतगती मार्गालगतच्यास एका नाल्यातून शेकडो मजूर आपल्या कुटूंबासह जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्रण रविवारी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर कोपरी पोलिसांनी या परप्रांतीयांना ताब्यात घेतले. रात्रीच्या अंधारात चक्क नाल्यातून हे मजूर आपल्या कुटूंबातील महिला आणि मुलांसह मार्गक्रमण करीत होते. नाल्यातून रस्ता पार करताना काही स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबेही दिले. दरम्यान, कोपरी पोलिसांनी या मजुरांसह अन्यही परप्रांतीयांच्या नावांची यादी करुन ४४ मजूरांना दोन बसेसने रविवारी शिरपूरकडे रवाना केले. दरम्यान, नौपाडा पोलिसांनीही अशाच दोन बसेसद्वारे ४४ परप्रांतीयांनाही एसटी बसने मध्यप्रदेशच्या सीमेवर रवाना केले.