धक्कादायक! ठाण्यात वास्तू सल्लागार कार्यालयातील मंदिरच केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:26 PM2020-10-22T22:26:44+5:302020-10-22T22:29:39+5:30
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरु असतांनाच ठाण्यात मात्र एका वास्तू सल्लागार कार्यालयातील चांदीच्या मंदिरासह चांदीची वाटी आणि त्यातील चांदीचे देवीचे नाणे लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका बंद असलेल्या वास्तू सल्लागार कार्यालयाचा टाळा तोडून चोरटयांनी चांदीच्या मंदिरासह चांदीची वाटी आणि त्यातील चांदीचे देवीचे नाणे लंपास केल्याची घटना ढोकाळी परिसरात घडली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड रेसिडेंन्सी येथील रहिवाशी गणेश सिलीवेरू (५७) यांचे जी.एस. इस्टेट कंन्सलटंट हे कार्यालय ढोकाळी येथील हायलँड एनेक्स येथे आहे. याच कार्यालयाचे अज्ञात चोरटयांनी १९ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० ते २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास टाळे तोडून कार्यालयात शिरकाव केला. या कार्यालयातील चांदीचा पत्रा असलेल्या ५० हजारांच्या लाकडी मंदिरासह प्रत्येकी एक हजार
रु पये किमतीची चांदीची वाटी आणि लक्ष्मीचा शिक्का असा ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २१ आॅक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे अधिक तपास करीत आहेत.