धक्कादायक! २.२८ कोटी रुपयांची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विकली; असा रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 06:44 AM2024-08-28T06:44:28+5:302024-08-28T06:44:48+5:30

बनावट कागदपत्रांवर जमीन विक्रीप्रकरणी एकास अटक.

Shocking Land worth Rs 2 crore sold for just five and a half lakhs | धक्कादायक! २.२८ कोटी रुपयांची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विकली; असा रचला बनाव

धक्कादायक! २.२८ कोटी रुपयांची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विकली; असा रचला बनाव

लोकमत न्यूज नेटवर्क , मीरा रोड : तोतया वारस दाखवून अन्य भाऊ मयत झाल्याचे खोटे दाखले, तसेच कागदपत्रे बनवून जमीन विक्री प्रकरणातील तोतया वारसास भाईंदर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. ही जमीन शासकीय दरानुसार सव्वादोन कोटींची असताना ती अवघ्या ५ लाख ५१ हजारांत तिची विक्री केली होती. शिवाय अन्य सात जमिनीसुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता. 

कर्नाटकच्या बंगलोर येथे राहणारे  दीपक शशिकांत शहा यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिस ठाण्यात २० मार्च २०२४ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दीपक यांचे वडील शशिकांत जिवंत असून, काका प्रवीण हरगोविंदास शहा, सूर्यकांत व हरकिशन यांचे निधन झालेले आहे. या कुटुंबाच्या भाईंदर येथे जमिनी असून, काही जमिनी पुरुषोत्तम पटेल यांना लीजवर दिल्या होत्या. 

प्रवीण हे मयत झाले असताना त्यांच्या अधिकारपत्राद्वारे जमीन विक्रीची कागदपत्रे अजय यांनी दीपक व कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर माहिती घेतली असता चंद्रकांत प्रभुदास घेलाणी (रा. अहमदाबाद, गुजरात) याला प्रवीण शहा दाखवून त्या नावाचा आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले. गुजरातच्या अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून, त्यांना कोणी वारस नाही आणि तोतया प्रवीण हा भाईंदर येथील जमिनींचा एकमेव वारस असल्याचा आदेश मिळवला.

ट्रस्टसाठी विक्री केली
तोतया प्रवीण याने त्याच्या आठ जमिनी पेशइमाम मोहंमद अब्दुल रऊफ (रा. गोम्स चाळ, कुर्ला पश्चिम) याला अधिकारपत्र दिले होते. एक जमीन तोतया प्रवीण याने बाजारमूल्य दोन कोटी २८ लाख असताना ती फक्त पाच लाख ५१ हजारांत देवेंद्र मणीलाल धासवाला (रा. गोरेगाव पश्चिम) व सुरेश जादवनकुम (रा. मालाड) यांना द बॉम्बे सतवारा ज्ञाती ट्रस्टसाठी विक्री केली होती. अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून, त्यांना कोणी  वारस नाही.

२८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
- कागदपत्रांमध्ये तसेच ओळखपत्रांमध्ये पत्ता चुकीचा असल्याने तोतया प्रवीण सापडत नव्हता. 
- सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक सोनावणे, उपनिरीक्षक प्रसाद गोवलेसह, राजेश पानसरे, रवींद्र भालेराव, जानन चव्हाण, राहुल काटकर यांनी  तपास करत तोतया प्रवीण ऊर्फ चंद्रकांत घेलाणी याला अहमदाबादमधून २४ ऑगस्ट रोजी अटक केली. 
- ठाणे न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: Shocking Land worth Rs 2 crore sold for just five and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.