धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने पाकिस्तानातील मित्राच्या मदतीने प्रेयसीला खंडणीची धमकी देणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:09 PM2020-05-07T20:09:21+5:302020-05-07T20:12:13+5:30
पाकिस्तानातील फेसबुकवरील मित्राच्या मदतीने ठाण्यातील पूर्वाश्रमीच्या प्रेयसिला तिच्याबरोबर काढलेल्या फोटोंच्या आधारे एक लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाºया भिवंडीतील परमेश भैरी या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नास नकार दिल्याने आपल्याच प्रेयसिला पाकिस्तानातील मित्राच्या मोबाईल क्रमांकावरुन एक लाखांच्या खंडणीची धमकी देणा-या परमेश मनोहर भैरी (28, रा. भिवंडी, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेनड्राईव्ह गहाळ झाल्याचा बहाणा करीत पूर्वाश्रमीच्या पे्रयसीसह तिच्या भावाला खंडणीसाठी तो धमकावित होता. त्याला आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आपल्या प्रेयसिने लग्नाला नकार दिला असून तिचे मार्च मध्ये दुस-याशीच लग्न होणार होते. पण ते सध्याच्या लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले आहे, अशी माहिती परमेश भैरी याने त्याच्या फेसबुकवरील पाकिस्तानातील मुशरफ या मित्राला दिली. मैत्रिणीबरोबरचे काही अश्लील फोटोही परमेशने त्या मित्राला पाठविले. नंतर तिचा आणि तिच्या भावाचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना त्याच फोटोंच्या आधारे त्याने पाकिस्तानमधील मोबाईलवरुन एक लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली. हे एक लाख रुपये दिले नाहीतर मात्र तुझे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही त्याने दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने अज्ञात आरोपीविरुद्ध ४ मे रोजी तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी परमेशकडे चौकशी केली तेंव्हा त्याने आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणला. आपल्यालाही अशीच धमकी आल्याचा दावा करीत या फोनशी आपला संबंध नसल्याचा त्याने कांगावा केला. नंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस नाईक प्रशांत बुडके, रोशन जाधव आणि नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने त्याला भिवंडीतून ६ एप्रिल रोजी दुपारी ताब्यात घेतले. त्यांनाही त्याने तशीच कहीणी ऐकवून आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, त्याचा फोनमधील एक एक पाकिस्तानी क्रमांक आणि या तरुणीला धमकी देणारा पाकिस्तानी क्रमांक यांच्यात साम्यता आढळल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर तिने लग्नाला नकार दिल्यामुळे आपण पाकिस्तानातील फेसबुकवरील मित्रालाच तिचा आणि तिच्या नातेवाईकांचा फोन क्रमांक देऊन त्याला धमकी देण्यास सांगितल्याची कबूली दिली. त्याला आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस निरीक्षक रमेश जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* असा घडला होता प्रकार
भूतकाळात यातील फिर्यादी तरुणीने प्रियकरासोबत व्यतीत केलेल्या प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेन ड्राइव्ह अन्य एका व्यक्तीच्या हाती लागला. आता याच पेनड्राइव्हच्या आधारे ब्लॅकमेल करीत तिच्याकडून एक लाखांची खंडणीची मागणी परमेश भैरी याने पाकिस्तानच्या मित्राच्या मार्फतीने मागितली होती. पाकिस्तानातील फोनवरील मित्राला ठाणे पोलीस पकडू शकणार नाहीत, अशा भ्रमात असल्यामुळेच त्याने ही शक्कल लढविली. मात्र खंडणी विरोधी पथकाने कौशल्याने केलेल्या तपासात तो अडकला आणि पकडला गेला.