धक्कादायक: ठाण्यात चोरटयांनीही सुरु केले मिशन बिगीन अगेन; सोनसाखळी हिसकावून दोघांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:19 AM2020-07-21T00:19:43+5:302020-07-21T00:47:46+5:30
चोरटयांनीही ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. घोडबंदर रोड भागात पातलीपाडा ब्रिजकडे जाणा-या रस्त्यावरुन ‘मॉर्निंग वॉक’ करणा-या महेश पणीकर (४८, रा. चेंबूर, मुंबई) यांची सोनसाखळी जबरीने हिसकावून दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे लॉकडाऊन शिथिल होत असतांना चोरटयांनीही ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. घोडबंदर रोड भागात पातलीपाडा ब्रिजकडे जाणा-या रस्त्यावरुन ‘मॉर्निंग वॉक’ करणा-या महेश पणीकर (४८, रा. चेंबूर, मुंबई) यांची सोनसाखळी जबरीने हिसकावून दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हे १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मेहुणे टोझी थॉमस यांच्यासमवेत हिरानंदानीकडून पातलीपाडा बाजूकडे जाणा-या रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांची ४० ग्रॅम वजनाची एक लाखांची सोनसाखळी झटका देऊन जबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांनी जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. मोरे हे अधिक तपास करीत आहेत.