धक्कादायक! व्याजाने दिलेल्या पैशांवरुन ठाण्यात तरुणाचा खून
By जितेंद्र कालेकर | Published: August 31, 2023 06:40 PM2023-08-31T18:40:03+5:302023-08-31T18:40:17+5:30
विल्हेवाटीसाठी मृतदेहही पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न: तिघांना अटक
ठाणे: व्याजाने दिलेल्या दीड लाख रुपयांसाठी अक्षय ठुबे (२५, रा. जुनी म्हाडा वसाहत, वसंत विहार, ठाणे) या तरुणाची तीन मित्रांनी कोयत्याने वार निघृण हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी गुरुनाथ जाधव (२७, रा. कोकणीपाडा, चितळसर, ठाणे) या मुख्य आरोपीसह तिघांना अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील वसंतविहार, म्हाडा वसाहतीमधील अक्षय ठुबे हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याबाबतची तक्रार त्याच्या कुटूंबीयांनी २९ ऑगस्ट २०२३ रोजी चितळसर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी संशयावरुन ३० आॅगस्ट रोजी गुरुनाथची चौकशी केली. त्याच्या अंगावर ओरखडेही दिसले. त्याने अक्षयशी काही संबंध नसल्याचा दावा केला. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिराेळे आणि उपनिरीक्षक प्रशांत सांगळे आदींचे पथक आरोपींच्या मागावर होते. तिघे संशयित मारेकरी टिकुजिनीवाडीजवळील हॅप्पीव्हॅली भागात वडापाव खाण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना समजले. त्याच आधारे गुरुनाथसह करण सावरा (२४, रा.कोकणीपाडा, ठाणे) आणि प्रशांत ऊर्फ बाबू जाबर (२१, रा. मानपाडा, ठाणे ) या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये गुरुनाथने अक्षयकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. ही रक्कम व्याजासह एक लाख ८६ हजार इतकी झाली होती. यातूनच दाेघांमध्ये वाद सुरु हाेते. याच भांडणातून गुरुनाथने मित्रांच्या मदतीने काटा काढण्याचा कट रचला. पैसे परत करण्याचा बहाणा करीत गुरुनाथने अक्षयला २९ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ ते ११ वाजण्याच्या दरम्यान त्याच्या घरी बोलवले.
गुरुनाथच्या घरी अक्षय आल्यानंतर त्याच्या कमरेवर, गळयावर आणि चेहर्यावर गुरुनाथ आणि करण या दोघांनीही काेयत्याने वार केले. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ३० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कोकणीपाडयातील अमराई नाल्याच्या बाजूला या तिघांनीही नेला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकुन ताे जाळण्याचा प्रयत्न केला. त्याची सोनसाखळी, अंगठी आणि मोबाईल फोनही काढून घेतल्याची कबूली या तिघांनी दिली.
याप्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करुन त्यांना ३१ ऑगस्ट राेजी सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अक्षयची सोनसाखळी आणि अंगठीही पोलिसांनी हस्तगत केली. घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेला मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याचे पाेलिसांनी सांगितले.