धक्कादायक! परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली ९० हजारांची रोकड घेतल्याने सावत्र आईचा खून: मुलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:40 PM2020-05-31T23:40:31+5:302020-05-31T23:44:13+5:30
नोकरी लावण्याच्या नावाखाली घेतलेले ९० हजार रुपये न दिल्याने तसेच भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या भावनेतून रेश्मा अन्सारी (२४) या सावत्र आईच्या गळयावर चाकूचे वार करुन निर्घृण खून करणाऱ्या शहानवाज अन्सारी (२४, रा. राबोडी, ठाणे) या सावत्र मुलाला राबोडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. एका सीसीटीव्हीतील चित्रणामध्ये दिसलेल्या रिक्षाच्या आधारे मोठया कौशल्याने पोलिसांनी खूनाचा छडा लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली सावत्र आईने घेतलेले पैसे दिले नाही. तसेच तिच्याच अनन्वित छळामुळे लहान भावाचाही मृत्यु झाला. यातूनच बदला घेण्याच्या भावनेतून रेश्मा युनूस अन्सारी (२४) या सावत्र आईच्या गळयावर चाकूचे वार करुन तिचा निर्घृण खून करणाºया शहानवाज अन्सारी (२४, रा. राबोडी, ठाणे) या सावत्र मुलाला राबोडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. त्याला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रेश्माला १८ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांची मुलगी आहे. तर तिचा पती युनूस याच्या पहिल्या पत्नीचा शाहनवाज हा मुलगा आहे. २९ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास साकेत रोडवर पदपथाच्या बाजूला तिचा मृतदेह गळयावर वार केलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळयात आढळला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी केलेल्या तपासात राबोडी भागातील अनेक सीसीटीव्ही पडताळण्यात आले. तेंव्हा २८ मे रोजी रात्री ८ वाजता रेश्मा एका रिक्षातून जातांना दिसली. कळव्यातील या रिक्षाच्या क्रमांकाच्या आधारे राबोडीतून शहानवाज याच्यापर्यंत पोलीस पोहचले. तोच हा शाहनवाज तिचा सावत्र मुलगा असून चाकूने तिचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि या गुन्हयासाठी वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली.
ती सावत्र आई असली तरी लहानपणापासूनच त्याच्यासह लहान भावाचाही तिने छळ केल्याचा दावा शाहनवाजने खूनाची कबूली दिल्यानंतर केला. शिवाय, तिच्याच छळामुळे लहान भावाचाही मृत्यु झाल्याचा आरोप त्याने केला. तिने कधीही काहीच मदत केली नाही. मात्र, परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाने त्याने साठवून ठेवलेली ९० हजारांची रक्कमही तिने एक वर्षापूर्वी शहानवाज याच्याकडून घेतली. त्यानंतर त्याला घरातून हाकलून दिले होते. वडिलांना सांगूनही तिच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. शिवाय, तिने घेतलेल्या पैशांबाबत विचारणा केल्यावरही ती टाळाटाळ करीत होती. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे कामही नसल्यामुळे जवळचे सर्व पैसेही संपले होते. तिच्याकडे पैसे मागितल्यानंतर तिने मात्र पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ करीत धमकी दिली. याच कारणातून तिचा खून केल्याची कबूली शहानरवाज याने पोलिसांना दिली. २८ मे रोजी रेश्मा राबोडी बाजारात भेटली असता पैशाबाबत बोलायचे आहे असे सांगून गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मित्राच्या रिक्षातून त्याने तिला साकेत रोडवर नेले. तिथेच तिच्या गळ्यावर रागाच्या भरात वार करुन तिचा खून केल्यानंतर मंगळसूत्र आणि कानातील झुमके काढले. नंतर रिक्षासह तिथून पळाल्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.