धक्कादायक ! मुलांच्या क्रिकेट खेळण्यातून एकाने केला दुसऱ्या पालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 09:04 PM2020-02-20T21:04:31+5:302020-02-20T21:10:54+5:30
अवघ्या पाच वर्षीय मुलांमध्ये खेळण्यातून झालेल्या वादाचे पडसाद त्यांच्या पालकांमध्ये उमटले. या दोन्ही मुलांच्या पालकांपैकी सियाराम तिवारी (४४) यांच्यावर अतुल द्विवेदी (३३) याने हल्ला केला. या हल्ल्यात तिवारी यांच्या कानाला त्यांनी चावा घेतल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा वाद पालकांपर्यंत गेल्यामुळे सियाराम तिवारी (४४, रा. मरीआईनगर, कोलशेत वरचा गाव, ठाणे) यांना अतुल द्विवेदी (३३, रा. मरीआईनगर, ठाणे) याने यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी द्विवेदी यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलशेत वरचा गाव भागातील रिक्षा चालक तिवारी यांचा मुलगा अंश (५) आणि त्यांच्या घरासमोरील रहिवाशी द्वीवेदी यांचा मुलगा अनमोल (५) हे दोघेही १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बॉल बॅट खेळत होते. त्यावेळी अचानक त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. हा वाद सोडविण्यासाठी तिवारी यांचा मोठा मुलगा आदित्य (१४) आणि मुलगी उन्नती (१३) हे दोघेजण तिथे गेले. त्यावेळी अतुल यांच्या भावाने तिवारी यांच्या मुलांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीमुळे उन्नतीने केलेली आरडाओरड ऐकून तिचे वडिल सियाराम तिवारी यांनी तिथे धाव घेत भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा द्विवेदी यांनी तिवारी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या धुमश्चक्रीत द्विवेदी यांनी तिवारी यांना उखाली पाडून त्यांच्या अंगावर बसून त्यांचा उजव्या कानाला चावा घेत तो कुरतडला. तसेच डाव्या खांद्यालाही त्यांनी चावा घेतला. यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी तिवारी यांनी द्वीवेदीविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.