धक्कादायक! कोपरीमध्ये एकाच रात्रीत चोरटयांनी फोडली चार घरे: तीन लाखांचा ऐवज लुबाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:24 PM2020-12-13T23:24:47+5:302020-12-13T23:26:56+5:30
कोपरीतील पारशीवाडीमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीमध्ये चार घरे फोडली. यामध्ये वसंत चव्हाण यांच्यासह दोन घरांमधून चोरटयांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल तीन लाख नऊ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तर अन्य दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरीतील पारशीवाडीमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीमध्ये चार घरे फोडली. यामध्ये वसंत चव्हाण यांच्यासह दोन घरांमधून चोरटयांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल तीन लाख नऊ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तर अन्य दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोपरीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोपरीतील पारशीवाडी भागात दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे त्याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. शनिवारी चव्हाण कुटूंबियांचे जेवण झाल्यानंतर ते सर्वजण झोपण्यासाठी अन्य एका घरात गेले. त्यामुळे त्यांचे घर रिकामे असल्याची संधी साधत रेकी केलेल्या चोरटयांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून शिरकाव करुन घरातील ५० हजाराची चांदीची बालाजीची मूर्ती, ९० हजारांचे सोन्याची दोन ब्रेसलेट, सोन्याच्या दोन साखळया, सोन्याचे चार कॉईन, सोन्याची तीन बिस्किटे, एक किलो वजनाचे ५० चांदीचे कॉईन असा दोन लाख ९० हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. १२ डिसेंबर रोजी रात्री ११.४५ ते १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याच परिसरातील अन्य एका घरातून १९ हजारांची रोकडही चोरटयांनी लांबविली. रविवारी सकाळी चव्हाण कुटूंब घरी आल्यानंतर चोरी झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. चव्हाण यांनी कोपरी पोलीस ठाण्यात या चोरीची तक्र ार दाखल केली आहे. त्याचवेळी अन्य दोन घरेही फोडून चोरीचा प्रयत्न झाला. पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने चोरटयांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही.