धक्कादायक! पोलीस ठाण्यातच हवालदाराला धक्काबुक्की करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 10:54 PM2020-12-02T22:54:49+5:302020-12-02T23:05:19+5:30
तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या एका फिर्यादीनेच कोपरी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून ठाणे अंमलदार कमलाकर पाटील यांना धक्काबुक्की करीत दमदाटी केली. याप्रकरणी अक्षय गुप्ता या आरोपीला कोपरी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कमलाकर पाटील (४७, रा. कासारवडवली, ठाणे) यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणणाºया अक्षय गुप्ता (२४, रा. कोपरी कॉलनी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोपरी कॉलनीतील शामनगर भागात राहणाºया अक्षय आणि त्याच्या भावजयीचे २९ नोव्हेंबर रोजी वाद झाले होते. त्यांचा हा वाद पोलीस ठाण्याबाहेरच मिटला. परंतू, १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा तक्रार देण्यासाठी आले. त्यावेळी प्रकार दखलपात्र की अदखलपात्र आहे, याची चौकशी पोलीस नाईक पाटील हे करीत असतांनाच त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाले. त्यावेळी केवळ तक्रारदारानेच माहिती द्यावी, इतरांनी बाहेर थांबावे, असे आवाहन पोलिसांनी केले. त्यावर तुम्ही कसे काम करतात, हेच पाहतो, अशी धमकी देत पाटील यांच्या अंगावर गुप्ता मारण्याच्या उद्देशाने धावून गेला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पाटील यांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुप्ताविरुद्ध १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांनी गुप्ता याला २ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. जमादार कोळी याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.