धक्कादायक! ठाण्यात मृताचा दाखला मिळविण्यासाठी मृतदेहाला घेऊन पोलिसांची सहा तास भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 08:56 PM2020-04-21T20:56:15+5:302020-04-21T21:02:17+5:30
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन जसे विस्कळीत झाले आहे. तसे मृत्युनंतरही एखाद्या व्यक्तीचा दाखला मिळणे कसे अवघड झाले आहे, याची प्रचिती ठाण्यातील पोलिसांना सोमवारी आली. या घटनेने संताप आणि हळहळही व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनामुळे पोलीस, डॉक्टर आणि नागरिकांमध्येही चांगलेच भीतीचे वातावरण आहे. सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या एका युवकाच्या मृतदेहालाही याचा फटका बसला. डॉक्टरांकडून तो मृत असल्याचा दाखला मिळण्यासाठी त्या मतृदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्यामुळे मृत्युनंतरही या मृतदेहाची तब्बल सहा तास अवहेलना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हावरे सिटी भागातील आदिवासी पाडा परिसरात आकाश जाधव याने झाडाला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चितळसर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो मृत आहे की नाही यासाठी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, हे रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांनी रु ग्णालयाच्या बाहेरच रु ग्णवाहिकेला थांबविले. मृतदेहासोबत असलेल्या पोलिसांनी पंचनामा दाखवूनही डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी करण्यास नकार दिला. त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. पोलिसांनी तिथे संपर्क केला असता त्यांनीही या युवकाला तपासून तो मृत आहे की नाही, याचा दाखला देण्यास नकार दिला. दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस हा मृतदेह घेऊन फिरत होते. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणली. तेंव्हा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गळफास घेतलेल्या युवकाला तपासून तो मृत असल्याचा दाखल दिला. अखेर सहा तास दाखल्यासाठी भटकंती करीत असलेल्या या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.
* लोकमान्यनगर भागातील ५५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युनंतर दुस-या दिवशी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या घटनेनंतर सुमारे ११४ लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या तपासणीला रुग्णालयाकडून विलंब झाल्याची शक्यता एका पोलीस अधिकाºयाने व्यक्त केली.