धक्कादायक! कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या पायावर घातली रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:50 PM2019-02-12T22:50:57+5:302019-02-12T23:02:52+5:30
रिक्षा चालकाविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या ठाणेनगर वाहतूक शाखेचे योगेश पाटील (३१) यांच्या पायाला धडक देऊन धूम ठोकणाऱ्या शराफत अली शेख (२२, रा. राबोडी, ठाणे) या चालकाला ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. नंतर सुटकेसाठी स्वत:चा गळा कापण्याचीही त्याने पोलिसांना धमकी देत कांगावा केला.
ठाणे : वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणा-या रिक्षा चालकाविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या ठाणेनगरवाहतूक शाखेचे योगेश पाटील (३१) यांच्या पायाला धडक देऊन धूम ठोकणा-या शराफत अली शेख (२२, रा. राबोडी, ठाणे) या चालकाला ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. अटकेनंतरही सुटकेसाठी त्याने कांगावा करून ‘मला सोडा, अन्यथा स्वत:चा गळा कापून घेईल, अशी धमकी दिल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता.
सिडको बस थांबा येथे ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास ठाणेनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस कॉन्स्टेबल पाटील हे वाहतूकीस अडथळा करणा-या वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी शेख यानेही त्याची रिक्षा रस्त्यातच उभी करून वाहतुकीस अडथळा केल्यामुळे पाटील यांनी त्याच्याकडे वाहनपरवान्याची मागणी केली. तेंव्हा वाहनपरवाना नसल्याचे सांगून त्याने रिक्षा विरुद्ध दिशेने अशोक सिनेमागृहाच्या रस्त्याने दामटली. पादचा-यांच्या जीवाला धोका निर्माण करून पाटील यांच्याही पायाला त्याने धडक दिली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून शेखला पकडले. यावेळी मला सोडा अन्यथा स्वत:चा गळा कापून घेईन, अशी धमकीही त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला सोमवारी रात्री १० वा. च्या सुमारास अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले.