धक्कादायक! मोटारकार शोरूमच्या विक्री प्रतिनिधीची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:39 AM2021-04-08T00:39:07+5:302021-04-08T00:50:02+5:30
ठाण्यातील ह्युंदाई मोटारकार शोरूमचे विक्री प्रतिनिधी सचिन राणे (४०) यांनी याच शोरूमच्या सातव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील ह्युंदाई मोटारकार शोरूमचे विक्री प्रतिनिधी सचिन राणे (४०) यांनी याच शोरूमच्या सातव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वीच राणे हे ह्युंदाई मोटारकार शोरूममध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून रुजू झाले होते. त्यांचे कामही चांगले होते. गेल्या एक महिन्यापासून मात्र ते अस्वस्थ वाटत होते, असे त्यांचे सहकारी सांगत होते. मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गालगत असलेल्या मुंबई बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यालगत ह्यमोदी हाऊसह्ण ही सात मजली इमारत आहे. याच इमारतीचा तळ अधिक एक मजल्यावर मोटारकारचे शोरूम आणि विक्री कार्यालय आहे. या कार्यालयात ते कार्यरत होते. सायंकाळी ४.३० वोण्याच्या सुमारास या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी राणे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे आढळले. तातडीने नौपाडा पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राणे यांचे कौटुंबिक वाद होते, की कार्यालयीन काही वाद होते, अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सचिन यांच्या मागे पत्नी आणि पाचवर्षीय मुलगा असा परिवार आहे.
सचिन राणे यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची चौकशी नौपाडा पोलीस करीत आहेत. आम्हालाही याबाबत अधिक माहिती नाही.
गौतम वर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ह्युंदाई शोरूम, ठाणे.