धक्कादायक! दूध स्टॉल मधून चक्क गुटखा आणि भांग विक्री
By धीरज परब | Published: September 30, 2023 01:02 PM2023-09-30T13:02:28+5:302023-09-30T13:03:04+5:30
Crime News: भाईंदर पूर्वेच्या एका सरिता दूध केंद्र स्टॉल मधून चक्क बंदी असलेला गुटखा आणि भांग ह्या अमली पदार्थची विक्री चालत असल्याचे पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले आहे .
- धीरज परब
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका सरिता दूध केंद्र स्टॉल मधून चक्क बंदी असलेला गुटखा आणि भांग ह्या अमली पदार्थची विक्री चालत असल्याचे पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले आहे . त्यामुळे महापालिके कडून दिल्या जाणाऱ्या स्टॉल मधूनच बंदी असलेले गुटखा , भांग सह तंबाखुजन्य पदार्थांची विक्री चर्चेत आली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी शाखेतील हवालदार प्रदीप टक्के यांना अमलीपदार्थ विक्रीची माहिती मिळाली . त्या नुसार निरीक्षक अमर मराठे , उपनिरीक्षक संतोष घाडगे सह टक्के . धनाजी इंगळे , एस . एस . कुडवे यांच्या पथकाने आझाद नगर जवळील गौरव धरम कांटा येथील सरिता दूध केंद्रावर छापा मारला.
त्याठिकाणी ब्रिजेश मेहिलाल प्रजापती ( ३६ ) रा . न्यू गोकुळ , आररनपी पार्क , भाईंदर पूर्व हा सापडला . स्टॉल मध्ये तपासणी केली असता राज्यात बंदी असलेला गुटखा , सुगंधी तंबाकू , पान मसाला तसेच भांगच्या गोळ्यांचा साठा पोलिसांना सापडला . गुटख्याचा साठा कुठून आणल्याचे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करत नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे . नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत . शहरातील पालिकेने दिलेल्या सरिता दूध केंद्र , दिव्यांग वा अन्य स्टॉल पैकी अनेक स्टॉल मध्ये सर्रास तंबाकूजन्य वस्तूंची विक्री होत असल्याचे दिसून येते . मात्र बंदी असलेला गुटखा , भांग गोळ्या आदी सुद्धा दूध केंद्रातून विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे .