धक्कादायक! ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह सात पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: April 14, 2020 07:34 PM2020-04-14T19:34:21+5:302020-04-14T19:45:09+5:30
एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंब्रा येथील आणखी एका अधिकाºयासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच पोलीस ठाण्यात चौघे तर आयुक्तालयात सात जणांचा कोरोना बाधीतांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे पोलिसांचीही चिंता वाढली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि पालिका अधिकारी कर्मचारी यांची माहिती घेण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कातील एका अधिकाºयासह चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांची कोरोनाची तपासणीही करण्यात आली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधीच मुंब्रा येथील एक निरीक्षक तर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यापाठोपाठ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांचीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ठाण्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या सातवर पोहचली आहे. यातील केवळ एक अधिकारी वगळता इतर सहा जणांवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.