धक्कादायक! नोकरीवरुन काढण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:38 PM2021-07-28T21:38:48+5:302021-07-28T21:54:10+5:30
नोकरीवरुन काढण्याची धमकी देत तसेच लग्न करण्याचेही अमिष दाखवून एका ३४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आशुतोष धुर्वे (४८, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नोकरीवरुन काढण्याची धमकी देत तसेच लग्न करण्याचेही अमिष दाखवून एका ३४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आशुतोष धुर्वे (४८, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या संबंधाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याचीही धमकी या कथित आरोपीने दिली होती.
पिडित महिलेने नौपाडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आशुतोष याने २०१० ते मार्च २०२१ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये हा प्रकार केला. या काळात त्याने कल्याणच्या एका हॉटेलमध्ये, ठाण्यातील तीन हात नाका येथील त्यांच्या कार्यालयातील बेडरुममध्ये, ठाण्यातील लोढा कॉम्पलेक्समधील एका मित्राच्या फ्लॅटवर तसेच आशुतोष याच्या खारेगाव येथील इमारतीमधील एका सदनिकेत वारंवार नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला दिलेल्या पैशांची मागणी करीत त्यांच्या संबंधांची व्हिडिओ क्लिप प्रसारीत करण्याचीही धमकी देत हा प्रकार सुरु ठेवला. त्याचवेळी तिला पतीपासून घटस्फोट घेण्यासही भाग पाडले. स्वत:चा घटस्फोट झालेला नसतांनाही तिला लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने संबंध केले. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र तू खालच्या जातीची आहे. आपण उच्च जातीचे असल्याचा दावा करीत आशुतोषने लग्नास नकार दिला. वारंवारच्या अत्याचाराला कंटाळून अखेर याप्रकरणी या महिलेने आरोपीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२१ रोजी लैंगिक अत्याचार (३७६, ४१७, ५०६) सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी सांगितले.