‘अवकाळी’चा फटका!

By Admin | Published: March 5, 2016 01:36 AM2016-03-05T01:36:13+5:302016-03-05T01:36:13+5:30

सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला

'Shocking' shock! | ‘अवकाळी’चा फटका!

‘अवकाळी’चा फटका!

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारपासून अवकाळी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. मात्र, शुक्रवारी सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला. या पावसाचा आंब्याच्या मोहराला तसेच भेंडी, काकडी, वांगी आदी भाज्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. मात्र, त्याच वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरी भागांत तरुणाईने हा पाऊस एन्जॉय केला.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. गुरुवारी सायंकाळपासून काही भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाला. शुक्रवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. रस्ते चिंब भिजले. सकाळी कार्यालय गाठणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. दिवा येथे पेंटाग्राफ जळाल्याने तर बदलापूर येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती. जिल्ह्याच्या काही भागांतून फळभाज्या, पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आंब्याच्या मोहरालाही पावसाने फटका दिला. काजूचेही नुकसान केले. एकीकडे ग्रामीण भागात यामुळे शेतकरी हताश झालेला असताना शहरी भागांत तरुणाईने पावसाचा आनंद लुटला. तलावपाळी, उपवन परिसरात तरुणाई पावसाचा आनंद घेताना दिसली.भिवंडी : पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावरील अंजूरफाटा व माणकोली भागांत मुख्यत्वे वाहतूककोंडी झाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे दहावीच्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठताना त्रास झाला. पहाटे ५ वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या उन्हाळ्याने बेजार झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. अडगळीतील छत्र्या बाहेर निघाल्या. काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने यंत्रमाग बंद पडले. दुपारी पाऊस थांबल्याने शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

Web Title: 'Shocking' shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.