धक्कादायक! ATM सेंटरमध्ये स्किमरचा वापर, कार्ड क्लोन करुन ४०० जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 04:37 PM2021-12-25T16:37:09+5:302021-12-25T16:38:38+5:30

याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ४१४ एटीएम कार्डचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे.

Shocking : skimmers Used in ATM center, cloning of cards and cheating of 400 people | धक्कादायक! ATM सेंटरमध्ये स्किमरचा वापर, कार्ड क्लोन करुन ४०० जणांची फसवणूक

धक्कादायक! ATM सेंटरमध्ये स्किमरचा वापर, कार्ड क्लोन करुन ४०० जणांची फसवणूक

Next

ठाणे- एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना बोलण्यात गुंतवून, चोरीने पीन नंबर पाहून, हातचलाखीने कार्ड वरील डेटा चोरुन आणि नंतर बनावट एटीएम कार्ड तयार करुन ४०० हून अधिक लोकांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोट्यवधींची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डायघर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. 

याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच ४१४ एटीएम कार्डचा डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे.

या प्रकरणी जमील अहमद मो. दरगाही शेख (२२), रा. काका ढांबा, पिसवली मानपाडा, कल्याण पुर्व, गोविंद हनुमंत सिंग (२५), धंदा- वेल्डींग, रा. महाविर बिल्डींग,  नवली रोड, जि. पालघर आणि आशिषकुमार उदराज सिंग (२२), धंदा- गॅरेज, कैलासनगर दुर्गा कॉलनी, विठ्ठ्ठलवाडी, कल्याण पुर्व अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

फिर्यादी महिला (६५) आणि त्यांचा नातू हे दहीसर, ठाणे  येथील एटीएममध्ये १० जुलै २०२१ रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या एटीएममधून १० हजार रूपये काढत असतांना, ३ अनोळखी लोकांनी फिर्यादी यांच्या नातवाला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि चोरून पिन नंबर पाहिला. तसेच त्याच्याकडून एटीएम कार्ड घेतले व हातचालाखीने कार्डवरील डाटा चोरून ते नातवाकडे परत दिले. यानंतर ११ जुलै ते  १३ जुलै या काळात त्यांनी फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून ७३ हजारांची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी तीन अनोखळी लोकांविरोधात गुन्हा विरोधात शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा सायबर फ्रॉड असल्याने त्यास तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रदीप सरफरे व तपास पथकाने तांत्रिक तपास करून तीघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना २७ डिसेंबर पर्यंत रिमांड मंजूर आहे.  

अशा पद्धतीने चोरायचे एटीएमचा डेटा -
एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांना आरोपी बोलण्यात गुंतवून ठेवत, त्यांचा पिन नंबर चोरून पाहत आणि त्याच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून, (पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या) स्किमरच्या सहायाने एटीएम कार्डचा डेटा चोरी करत आणि यानंतर, चोरी केलेल्या डेटा रायटरच्या सहायाने ते दुसऱ्या एटीएमवर कॉपी करून पैसे काढत .

एटीएम कार्ड क्लोन करण्याची पध्दत - 
अटकेत असलेले आरोपी, डार्कवेवरून एटीएम कार्ड स्किमर, कार्ड रायटर खरेदी करून, लॅपटॉपव्दारे एटीएम कार्ड क्लोन करीत होते. यासाठी ते जुन्या बंद पडलेल्या किंवा मुदत संपलेल्या एटीएम कार्डवरील डेटा रायटरच्या सहायाने ब्लॅक करत आणि यानंतर त्यावर चोरी केलेला डेटा कॉपी (राईट) करून कार्ड क्लोन करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सद्यस्थितीत बँका आधुनिक पध्दतीचे एटीएम मशीनचा वापर करीत असून, क्लोन कार्ड आधुनिक एटीएम मशीन मध्ये चालत नसल्याने ज्या ठिकाणी जुने पारंपारीक पद्धतीचे एटीएम मशीन आहेत त्या एटीएममधून पैसे काढले जात होते. असेही तपासात  निष्पन्न झाले आहे.

आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले साहित्य -
अटकेत असलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापर केलेले स्किमर मशीन - १८ हजार, कार्ड रायटर - ५ हजार, लॅपटॉप - १५ हजार, वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळया व्यक्तींच्या नावाचे ४२ एटीएम कार्ड आणि रोख रक्कम - २२ हजार, असा ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपच्या तांत्रिक तपासात ४१४ एटीएम कार्डचा चोरलेला डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. दरम्यान आता संबंधीत बँकांना पत्रव्यवहार करून पिडीत लोकांची माहिती प्राप्त करून कार्यवाही केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Shocking : skimmers Used in ATM center, cloning of cards and cheating of 400 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.