धक्कादायक! गावी जाण्यासाठी ठाण्यातील मजूराने अशी लढविली शक्कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:56 AM2020-04-09T00:56:01+5:302020-04-09T01:06:36+5:30
कोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का? याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, यातच तो अडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शहरात अडकलेल्या मजूरांकडून अनेक युक्त्या लढविल्या जात आहेत. ठाण्यातील मोहम्मद हुसेन या मजूराने ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला चक्क ४० मजूरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा फोन केला. प्रत्यक्षात, या मजूरांपैकी कोणीही उपाशी नसल्याचे मंगळवारी उघड झाले.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला लोकपुरम, वसंत विहार येथील ‘आशर बिल्डींग’ या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ४० मजूर असल्याचा फोन ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला होता. याठिकाणी हे सर्व मजूर उपाशीपोटी असून त्यांच्या जेवणाची सोय करावी, अशी मागणीही त्याने केली. त्याच्या फोनची गांभीर्याने दखल घेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी भेट दिली. मात्र, त्याने हा बनावट फोन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी चितळसर पोलिसांना त्यांनी माहिती दिली. तेंव्हा आपल्याला गावी जायचे असल्यामुळे हा फोन केल्याची प्रांजळ कबूली त्याने दिली. हे समल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी त्याला समज देऊन परिस्थितीचे गांभीर्यही पटवून दिले. त्याला समज दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.