धक्कादायक! ठाण्यात दोन वर्षांत २३ लाखांची वीजचोरी करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 08:58 PM2019-10-15T20:58:10+5:302019-10-15T21:06:30+5:30
गेल्या दोन वर्षांपासून मीटरमध्ये फेरफार करुन तब्बल एक लाख १९ हजार ६७७ युनिटची चोरी करून २३ लाख दोन हजार २३८ रुपयांची वीजचोरी करणा-या कनोज उतेकर आणि निलेश उपाले या दोघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या दोन वर्षांमध्ये विजेचा अनधिकृतपणे वापर करून एक लाख १९ हजार ६७७ युनिटची चोरी करून २३ लाख दोन हजार २३८ रुपयांची वीजचोरी करणा-या कनोज उतेकर आणि निलेश उपाले या दोघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाकंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील गडकरी उपविभागाचे सहायक अभियंता हेमंत चौरे आणि माधुरी देशमुख हे आपल्या पथकासह ३१ आॅगस्ट २०१९ रोजी वीजमीटर बदलण्याच्या कामासाठी ‘मोनालिसा को-आॅपरेटिव्ह सोसायटी’मध्ये गेले. तिथे दीप प्रॉपर्टीज डेव्हलपर्स आणि इन्फ्रास (बॉडीटॉक जिम) चे मालक उतेकर आणि उपाले यांचे मीटर बदलण्याची त्यांनी कार्यवाही केली. त्यावेळी त्यांच्या वीजमीटरचे सील योग्य स्थितीमध्ये नसल्याचे आढळले. ही बाब संबंधित ग्राहकांच्याही निदर्शनास आणून ते मीटर सील करून तपासणीसाठी ठाण्याच्या चाचणी विभागात पाठविण्यात आले. त्यानंतर, २६ सप्टेंबर २०१९ रोजी संबंधित ग्राहकांच्या समोरच त्याची चाचणी केली. तेव्हा, या मीटरमध्ये खोडसाळपणे टॅम्पर केल्याचे आढळले. या मीटरमध्ये ६५ टककयांपेक्षा कमी रीडिंग होत होते. ३० सप्टेंबर रोजी हे मीटर फिरते पथक यांच्या कार्यालयात पंच आणि ग्राहकांसमोर उघडण्यात आले. या तपासणीतही ग्राहकाने एक्सटर्नल सर्किट हे या मीटरच्या हिरव्या रंगाच्या पीसीबीला जोडल्याचे उघड झाले. त्यामुळेच हे मीटर ६५ टक्के कमी रीडिंग वाचन करीत होते. या पाहणीमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या आधारावर याठिकाणचा वीजपुरवठा भरारी पथकाने खंडित केला. त्यानंतर, २३ लाखांच्या वीजचोरीप्रकरणी उतेकर आणि उपाले या दोघांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यांतर्गत १४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.