धक्कादायक! ठाण्यात सिगारेटसाठी दोन पोलिसांसह तिघांनी केली विक्रेत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:38 PM2020-04-13T23:38:46+5:302020-04-13T23:44:22+5:30
ठाण्यातील कळवा भागात रविवारी मध्यरात्री मुंब्रा येथील दोन पोलिसांसह एका रिक्षा चालकाने सिगारेटच्या मागणीसाठी चक्क एका विक्रेत्या पिता पुत्राला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. अशा पोलीस किंवा नागरिकांविरुद्धही साथ प्रतिबंधक कायद्यातील कलम १८८ नुसार कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कळवा आणि मुंब्रा भागात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाकडूनही कठोर परिश्रम घेतले जात आहेत. तर दुसरीकडे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांसह तिघांनी कळव्यातील गांधीनगर येथील एका किराणा विक्रेत्याकडे सिगारेटची मागणी करण्यात आली. ती न दिल्याने बकुल परमार (३२) आणि अंकेश परमार (१२) या पिता पुत्राला मारहाण करुन बघून घेण्याची धमकी देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी कुमार पुजारी (३२, रा. मुंब्रा), मंदार कांबळे या दोन पोलिसांसह विशाल बिराडे या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीसह दारुची दुकानेही सध्या बंद आहेत. अशी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर पोलिसांकडून साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार कारवाई देखिल केली जात आहे. असे असूनही कळवा, गांधीनगर येथील राणा टॉवर भागातील बकुल या किराणा व्यापाºयाला पुजारी याच्यासह तिघांनी आपण पोलीस असून आम्हाला सिगारेट आणि तंबाखू दे, असे म्हणत त्याला दुकान उघडण्यास भाग पाडले. आमच्या दुकानात सिगारेट आणि तंबाखू नसल्याचे बकुल यांनी सांगितल्यानंतरही त्यांना तसेच त्यांचा मुलगा अंकेश याला या तिघांनी जबर मारहाण केली. हा प्रकार १२ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडला. कहर म्हणजे त्यांच्यापैकीच एकाने या दुकानातील काही रोकडही घेतल्याचा आरोप अंकेश यांनी केला आहे. रात्री कळवा पोलिसांना पाचारण करुन दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला होता. त्यालाही नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुळात संचारबंदीच्या काळात सिगारेट विक्री करणाऱ्यांवर जर साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला जात असेल तर सिगारेट मागण्यासाठी दुकान उघडण्यास भाग पाडणाºया पोलिसांविरुद्धही तीच कलमे लावली जावीत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहेत.
‘‘ या प्रकरणामध्ये मुंब्रा पोलीस ठाण्याचे पुजारी आणि कांबळे हे दोन पोलीस कर्मचारी आहेत. तर बिराडे हा रिक्षा चालक आहे. सिगारेट मागण्यावरुन विक्रेता आणि या तिघांमध्ये बाचाबाची झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असून सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’
विजय दरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे