धक्कादायक! ठाण्यातील मेडिकल दुकान कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात दोन महिलांचाही समावेश
By जितेंद्र कालेकर | Published: January 6, 2020 12:30 AM2020-01-06T00:30:59+5:302020-01-06T00:35:01+5:30
ठाण्यातील कळवा येथील औषध विक्रीच्या दुकानात गोळीबार करुन हल्लेखारोने एक आठवडयांपूर्वी पलायन केले होते. या खून प्रकरणात हल्लेखोरासोबत टेहळणीसाठी आणखीही दोन महिला होत्या, अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा, शिवाजीनगर येथील एका औषधविक्रीच्या दुकानात चोरीसाठी शिरलेल्या दरोडेखोराने केलेल्या गोळीबारात प्रेमसिंग राजपुरोहित या कर्मचा-याची हत्या झाली होती. या हत्येनंतर पसार झालेल्या दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी हे प्रकरण आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे कळवा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे या खून प्रकरणात एक हल्लेखोरच नव्हे तर आणखीही दोन महिलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कळवा पूर्व येथील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका दरोडेखोराने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. चोरी करून पळण्याच्या बेतात असतानाच दुकानामध्ये झोपलेल्या प्रेमसिंग या कर्मचाºयाला दरोडेखोराचा पाय लागल्याने त्याला जाग आली. त्याने दुकानात शिरलेल्या या दरोडेखाराला प्रतिकार करताच त्याने रिव्हॉल्व्हरमधून दोन फैरी झाडल्या. यामध्ये छातीत गोळी शिरल्याने प्रेमसिंगचा मृत्यू झाला. दुकानातील अवघी आठ हजार ६५० रुपयांची रोकड लुटण्यासाठी गोळीबार करून दरोडेखोराने पलायन केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनासह चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोपविले आहे. ठाणे शहर युनिट एकसह भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट तसेच कळवा पोलिसांचे एक पथक अशी सहा पथके यातील आरोपीचा शोध घेत आहेत. दरोडा आणि गोळीबाराचा सर्व प्रकार मेडिकलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याआधारे ठाणे, मुंबई, नाशिक, शिर्डी आणि बुलडाणा आदी ठिकाणी आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. मात्र, आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. लवकरच आरोपी पकडला जाईल, असा विश्वास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आरोपी एक नव्हे तीन
कळवा येथील गोळीबार प्रकरणात मेडीकलच्या दुकानात एका हल्लेखोराचे छायाचित्र आले आहे. मात्र, त्याच्यासोबत आणखीही दोन महिला असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही शिवाजीनगर परिसरात सुमारे दोन तास घुटमळत होते. त्यामुळे हा हल्ला नेमकी चोरीसाठी झाला की त्यामागे आणखीही काही कारण आहे, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली.
राज्यभरात आरोपीचे फोटो पाठविणार
या गुन्ह्याच्या तपासाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ४ जानेवारी रोजी आढावा घेतला. मेडिकल दुकानात मिळालेल्या सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे मुंबई आणि ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हल्लेखोराचे छायाचित्र पाठविण्यात आले आहे. आता हे छायाचित्र राज्यातील इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच नियंत्रण कक्षामध्येही पाठविण्यात येणार आहे. ठाणे, मुंबईतील अभिलेखावरील गुन्हेगार (हिस्ट्री शिटर) यांची यादी तसेच फोटोही पडताळले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.