उल्हासनगरात बाळ विक्रीचा धक्कादायक प्रकार, २२ दिवसाच्या मुलाची ७ लाखाला विक्री
By सदानंद नाईक | Published: May 18, 2023 06:40 PM2023-05-18T18:40:05+5:302023-05-18T18:40:23+5:30
ठाणे क्राईम विभागाची कारवाई, ५ जणांना अटक
उल्हासनगर : शहरात कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये अवघ्या २२ दिवसाच्या बाळाची ७ लाखाची विक्री करण्याचा प्रकार ठाणे क्राईम ब्रॅंचने उघड केला. याप्रकरणी ५ जणांना अटक केली असून १० जणांचे पथक याबाबत चौकशी करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये एका लहान बाळाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर, त्यांनी बुधवारी ३ वाजता धाड टाकण्यात आली. लहान मुलाच्या विक्रीचा सौदा होत असल्याची माहिती समाजसेविका सानिया हिंदुजा, राष्ट्रवादीचे सोनू पंजाबी यांना माहिती मिळाली होती. त्यांनी ठाणे क्राईम ब्रॅंचशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, कृष्णा कोकणी, महिला पोलीस तेजश्री शेडके यांना माहिती दिली. महालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आल्याची माहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
बनावट ग्राहक पाठविलेल्या महिलेने, मला दोन मुली असून मुलगा हवा आहे. असे या महिलेने सांगितल्यावर २२ दिवसाच्या बाळाचा ७ लाखात सौदा झाला. नसिंग होमच्या डॉ.चित्रा चैनानी यांच्या सहकारी काम करणाऱ्या संगीता, प्रतिभा आणि बेळगाव मधील डेमन्ना यांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ४ महिलांसह एक पुरुष आरोपी असे एकून ५ जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी देण्यात आली. महालक्ष्मी नर्सिंग होम मधून किती लहान मुलांची विक्री करण्यात आली. याचा तपास कारण्यासाठी १० जणांचे पथक करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. दरम्यान या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली असून यापूर्वीही लहान मुलाच्या खरेदी-विक्रीचे प्रकार झाल्याची माहिती राजकीय नेत्यांनी दिली. तसेच डॉक्टरी क्षेत्राला यामुळे गालबोट लागले आहे.
लहान बाळाच्या विक्रीने खळबळ
शहरात यापूर्वीही लहान बाळाची विक्री प्रकरण गाजले होते. यामध्येही नर्सिंग होमच्या डॉक्टरसह सहकार्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. महालक्ष्मी नर्सिंग होम मध्येही आता पर्यंत किती बाळाची विक्री झाली. याचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आले.
ग्राहक बघून बाळाची किंमत
२२ दिवसाच्या बाळाची ७ लाखाला विक्री झाल्याचा प्रकार उघड झाला तरी, ग्राहक बघून खरेदी-विक्री होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.