धक्कादायक! ठाण्यात मोबाईल चोरटयाशी झालेल्या झटापटीत रिक्षातील प्रवासी महिलेचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:18 PM2021-06-10T22:18:44+5:302021-06-10T22:22:38+5:30
मोबाईलची चोरटयाशी प्रतिकार करतांना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता रिक्षा प्रवासा दरम्यान ठाण्यातील कन्मीला रायसींग (२७) महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोबाईलची चोरटयाशी प्रतिकार करतांना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता रिक्षा प्रवासा दरम्यान ठाण्यातील कन्मीला रायसींग (२७) महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे. चोरटयाकडून तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सुुरु असतांनाच ती खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईत राहणारी लालचुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलीना, सांताक्रुझ) ही तिची मैत्रीण कन्मीला हिच्यासह ठाण्यातील विवियाना मॉल येथून ९ जून रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावरील तीन हात नाका येथील ओपन जीम जवळील रस्त्याने मुंबईकडे रिक्षातून जात होत्या. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन दोघेजण त्यांचा पाठलाग करीत आले. त्यांच्यापैकी दोघांनीही रेनकोट घातलेला होता. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्याने कन्मीला हिच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. हा हिसका इतका जोरदार होता की, हा मोबाईल त्याच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरु असतांना ती तोल जाऊन खाली कोसळली. यात डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तासाभरानेच तिचा मृत्यु ओढवला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने भिवंडीतून गुरुवारी अल्केश परवेझ मोमीन अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या आधारे अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.