धक्कादायक ! वैफल्यग्रस्त तरुणीचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 09:47 PM2020-02-06T21:47:08+5:302020-02-06T21:57:16+5:30

आजारामुळे मानसिकरित्या वैफल्यग्रस्त झालेल्या अंजली कश्यप (१९) या तरुणीने कोपरी येथील पादचारी पूलावरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. तिच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Shocking! young lady attempts suicide in Thane | धक्कादायक ! वैफल्यग्रस्त तरुणीचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Next
ठळक मुद्देकोपरी येथील पादचारी पुलावरून घेतली उडीखासगी रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त झालेल्या अंजली अरविंद कश्यप (१९, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणीने कोपरी येथील पादचारी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात दोन्ही पाय जायबंदी झाल्यामुळे तिच्यावर ठाण्यातील वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
ठाणे पूर्वेकडील रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या बसथांब्याच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलावरून अंजली हिने ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिला तातडीने कोपरी येथील ‘आरोग्यम्’ या खासगी रुग्णालयात तिथून जाणाऱ्या काही नागरिकांनी दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात नातेवाइकांनी दाखल केले. ती बेशुद्धावस्थेत असल्यामुळे तिने उडी नेमकी कोणत्या कारणामुळे घेतली, हे समजू शकले नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे ती वैफल्यग्रस्त होती. यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोपरी पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून सहायक पोलीस निरीक्षक मनीष पठाणे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.
.............................
दोन महिन्यांतील दुसरी घटना
यापूर्वीही वागळे इस्टेट, रघुनाथनगर येथील रहेजा कॉम्प्लेक्ससमोरील पादचारी पुलावरून एका २० वर्षीय तरुणीने १ डिसेंबर २०१९ रोजी उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा २ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्या तरुणीची अद्यापही ओळख न पटल्याने तिच्या नातेवाइकांचा अजूनही वागळे इस्टेट पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shocking! young lady attempts suicide in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.