धक्कादायक! ठाण्यात बेरोजगारीला कंटाळून तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 09:48 PM2020-09-13T21:48:44+5:302020-09-13T21:51:13+5:30
गेली सहा महिने कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. त्यातच कोणताही कामधंदा नसल्यामुळे श्रीनगर भागात राहणाऱ्या मयुरेश पवार या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बेरोेजगारीला कंटाळून वागळे इस्टेट, श्रीनगर भागात राहणा-या मयुरेश पवार (३५) या विवाहित तरुणाने पाच मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
श्रीनगर भागातील ‘शिवश्रद्धा अपार्टमेंट’ मध्ये मयुरेश हा त्याची पत्नी आणि आईसोबत वास्तव्याला आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मयुरेश हा पत्नीसह इमारतीच्या गच्चीवर गेले. दरम्यान, काही वेळाने त्याने गच्चीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. मयूरेशच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. त्यांना अपत्य नव्हते. शिवाय, त्याला कामधंदाही नव्हता. तो व्यसनीही होता. अशा अनेक कारणांमुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.