आदर्श लोकशाही मानल्या गेलेल्या अमेरिकेत गोळीबार ही दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:15 AM2021-01-10T00:15:52+5:302021-01-10T00:16:08+5:30

राज्यपाल भगतसिंह काेश्यारी : आणीबाणीनंतरच्या जागवल्या आठवणी

The shooting is an unfortunate incident in America, which is considered an ideal democracy | आदर्श लोकशाही मानल्या गेलेल्या अमेरिकेत गोळीबार ही दुर्दैवी घटना

आदर्श लोकशाही मानल्या गेलेल्या अमेरिकेत गोळीबार ही दुर्दैवी घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे :  राजकारणात खुर्ची इतकी महत्त्वाची असते की त्या खुर्चीवरून जगभरात आदर्श मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेत गोळीबार झाला हे दुर्दैव आहे. मात्र भारतात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, तेव्हा त्या विरोधात जनतेने आंदोलन केल्यामुळे आपल्या पंतप्रधानांना खुर्ची सोडावी लागली होती. इतका आदर्श विचार, आदर्श चिंतन भारतातच दिसते, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले.
ठाण्यात आयोजित ३५ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर तसेच आमदार निरंजन डावखरे व्यासपीठावर उपस्थित होते. केळकर यांनी या वेळी राज्यपालांचे स्वागत केले. उद्घाटनाच्या सुरुवातीला कोश्यारी यांनी उपस्थितांशी “मला खोकला होतोय, इतकी मराठी मी शिकलोय,” असा मराठीत संवाद साधत आपल्या मिश्कील स्वभावाची चुणूक दाखवली.
‘सोने की चिडीया’ म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरूच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला ‘विश्वबंधुत्व’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश दिला. आपल्या देशाला संत, थोर महापुरुष व व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारांवर देश चाललाय हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला इतिहास हेच देशाचे प्रजातंत्र आहे. 

अनेक आक्रमणांनंतरही आपला देश जिवंतच नाही, तर समृद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. ही कोणत्या पक्षाची विचारधारा नाही, तर ती देशाची, जगाची आवश्यकता आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील १८० देश एकत्र येतात ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे, असे म्हणत कोश्यारी यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आहे. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रत्येक जण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू, उत्पादन विकणे बंद करणे हे फक्त भारतच करू शकतो, इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्या देशात नाही, असेही कोश्यारी म्हणाले.

nतत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या पुस्तकात पंतप्रधानांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला असल्याचा कोश्यारी यांनी आवर्जून उल्लेख केला.
nपूर्वी धान्याची आपल्या देशात आयात व्हायची. आता मात्र धान्य गोदामांमध्ये सडतेय, इतका देश सुजलाम् सुफलाम् आहे. देशाला समृद्ध बनवणे हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ नाही, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: The shooting is an unfortunate incident in America, which is considered an ideal democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.