कल्याणमध्ये दुकान बाहेरून बंद आतमध्ये खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:11+5:302021-04-15T04:39:11+5:30
कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू झाले आहेत. महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवावगळता ...
कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार कडक निर्बंध लागू झाले आहेत. महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना काही दुकानदार दुकानाचे शटर डाऊन करून आतमध्ये विक्री करीत आहेत. अशा दुकानांविरोधात महापालिकेने कारवाई करून १२ दुकाने सील केली आहेत.
बुधवारी सील केलेल्या दुकानांमध्ये न्यू अंबिका साडी सेंटर आणि मनोज ट्रेडर्स यांचा समावेश आहे. ही कारवाई प्रभाग अधिकारी अक्षय गुडदे यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसात आतापर्यंत क प्रभागातील १२ दुकाने ३० एप्रिलपर्यंत सील केली आहेत. नियमावली लागू झाली तेव्हा पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ आस्थापनांच्या विरोधात कारवाई केली आहे.
दुकानदारांसाठी नियम शिथील केलेले नाहीत. दुकाने बंद असल्याने अनेक दुकानदारांनी नवी शक्कल लढविली आहे. बंद दुकानासमोर दुकानाशी संबंधित एक कामगार उभा राहतो. मोबाइलवर ऑर्डर घेऊन ग्राहकांना कपडे उपलब्ध करून दिले जात आहेत. काही दुकानांना मागच्या बाजूने दार आहे. मागच्या दाराने काही दुकानात व्यवहार सुरू आहे. काही दुकानात बंद शटरच्या आड खरेदी विक्री सुरू आहे. त्याचा प्रत्यय कल्याण बाजारपेठ परिसरात आल्याने महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. मात्र, यामुळे कोरोना आणखीन पसरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार केवळ कल्याण बाजारपेठेत सुरू नसून डोंबिवलीतही काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करून खरेदी-विक्री करीत आहेत.
---------------------