ठाण्यात दुकाने, पेट्रोलपंप, मॉल यांनी पाळला उत्स्फूर्तपणे बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:36 AM2018-09-11T02:36:49+5:302018-09-11T02:37:03+5:30
महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ठाणे : महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुकाने, पेट्रोलपंप, मॉल बंद होते. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक एक तास रोखून धरली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी व मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभर सुरळीत सुरू होती. काँग्रेस आणि मनसे नेते व कार्यकर्त्यांनी पायी चालून भाजपाचा निषेध केला, तर राष्टÑवादीने बैलगाडी, हातगाडी घेऊन पूर्व द्रुतगती मार्गावर उतरून आंदोलन केले.
काँग्रेस, मनसे आणि राष्टÑवादीने एकत्र येऊन रॅली काढली. काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी पायी, तर आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी बैलगाडी आणि घोडागाडी घेऊन आंदोलनात सहभागी झाले. पाचपाखाडी ते तीनहातनाक्यापर्यंतच्या या रॅलीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मंदावली होती. नितीन कंपनी व तीनहातनाका येथे या आंदोलकांनी ठिय्या मारून आंदोलन केले.
>४५४ जणांवर कारवाई
शहरातून बेकायदेशीरपणे रॅली काढल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, मनोज शिंदे आणि अविनाश जाधव यांच्यासह ५३ जणांना नौपाडा पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात बंदपूर्वी आणि त्या काळात ४५४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
वाढत्या महागाईविरोधात हे आंदोलन होते. पेट्रोल डिझेल, गॅसचे दर वाढले असून त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये आम्ही सहभागी झालो.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादी