दुकानदारांनी हडपले पदपथ
By admin | Published: January 14, 2017 06:30 AM2017-01-14T06:30:12+5:302017-01-14T06:30:12+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात अयशस्वी ठरले असतानाच या परिसरातील
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात अयशस्वी ठरले असतानाच या परिसरातील दुकानदारांकडून पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणांकडेही महापालिकेचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाचा त्याकडे होत असलेला कानाडोळा पाहता ‘मस्त चाललंय आमचं’, असे चित्र दुकानदारांच्या बाबतीत दिसून येते. सामानांच्या अतिक्रमणाने पदपथ व्यापल्याने सांगा चालायचे कोठून, असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे.
फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी व अतिक्रमणांतून वाट काढणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होऊन बसले आहे. दुसरीकडे वाहतुकीवर परिणाम होऊन चालकांनाही कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्रासपणे कल्याण-डोंबिवलीत पाहावयास मिळते. फेरीवाला, अतिक्रमणविरोधी कारवाईवर लाखो रुपये महापालिकेचे खर्च होत असताना दिवसागणिक वाढणारी फेरीवाल्यांची संख्या प्रशासनाच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. दिखाऊ कारवाईमुळे फेरीवाल्यांचे फावले असताना दुकानदारही यात मागे नाहीत. दुकानातील अतिरिक्त सामान बिनदिक्कतपणे पदपथावर मांडले जात आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे, तर पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण,असे चित्र पाहावयास मिळत असल्याने यातून नागरिकांना वाट काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे. डोंबिवली कडील रेल्वे स्थानकानजीकच्या नेहरू रोडवरील दुकानदारांनी पदपथ बळकवताना त्यावर शेड टाकून मालाची विक्री सुरू केली होती. शेड व वाढीव बांधकामे दोन दिवसांपूर्वी केडीएमसीने तोडली. ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयांनी केलेल्या या कारवाईत ५४ दुकानांवरील वाढीव शेड तोडण्यात आल्या. स्वाती सिंगासने आणि स्वाती गरूड या प्रभाग अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई झाली. शेडवर कारवाई झाल्यानंतर दुकानदारांनी शटरच्या आतील जागेचाच वापर करणे बंधकारक आहे. मात्र, दुकानदार आजही पदपथावरच सामान मांडून त्याची विक्री करताना दिसतात. त्यामुळे त्यांनी पदपथ गिळंकृत केल्याचे नेहरू रोडवर सर्रास दिसत आहे.
रस्त्यावरील फेरीवाले हटवण्यात असमर्थ ठरलेल्या अधिकाऱ्यांनी पदपथावरील अतिक्रमणांकडे तरी गांभीर्याने लक्ष घालावे, जेणेकरून त्यावरून तरी चालणे सोयीस्कर ठरेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)