सोशल डिस्टेसींग नियमाचे पालन न झाल्यास दुकानादारांवर होणार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:04 PM2020-04-10T15:04:02+5:302020-04-10T15:12:19+5:30
भाजी मंडईची गर्दी कमी होत नसतांना आता जांभळी नाका येथील होलसेल मार्केटमध्ये देखील नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता दुकानदारांनी सोशल डिस्टेसींगचे पालन न केल्यास अशा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी ताकीद पालिकेने दिली आहे.
ठाणे : ठाण्यातील भाजी मंडईनंतर खारकर आळी आणि जांभळी नाका परिसरात असलेल्या अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या होलसेल मार्केटमध्ये देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या ठिकाणीही सोशल डिस्टेसींगचे नियम नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसवले आहेत. शुक्र वारी या मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यानंतर आता यासंदर्भात प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून सोशल डिस्टेसींगची जबाबदारी संबंधित होलसेल दुकादारांवर टाकण्यात आली आहे. तशाप्रकारच्या नोटिस येथील १०० दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सोशल डीस्टनिसंगच पालन करावे यासाठी होलसेल दुकानदारांनीच स्वयंसेवक नेमावे अन्यथा साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वेळ पडल्यास संबधींत दुकानदारांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले जातील असा इशाराही पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
वारंवार सूचना करूनही ठाण्यातील भाजी मधील गर्दी एकीकडे कमी होत नसताना दुसरीकडे अन्नधान्य मार्केटमध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. प्रशासनाच्या वतीने कळवा, मुंब्रा आणि दिवा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले असले तरी, ठाण्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यासाठी सवलत दिली आहे. त्यामुळे ही दुकाने सुरु राहणार असली तरी नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसून भाजी मंडईप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र खारकर आळी परिसरात असलेल्या होलसेलच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. ठाण्यातील हे सर्वात जुने मार्केट असून या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहरातून नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. मालाची डिलेव्हरी करण्यासाठी देखील या ठिकाणी मोठे ट्रक येत असल्याने या मार्केटमध्ये अक्षरश: नागरिकांना चालणे देखील कठीण होते. शुक्र वारी सकाळी देखील नागरिकांनी अशाच प्रकारे या ठिकाणी गर्दी केली होती.
या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर संपूर्ण मार्केटची पाहणी पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून नागरिकांनी दुकानांचा बाहेर अक्षरश: गर्दी केल्याचे उघड झाले असून दुकानदारांकडून देखील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता येथील १०० दुकादारांना नोटीस पाठवण्यात आल्या असल्याची माहिती नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी दिली आहे. यामध्ये नागरिकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यासाठी प्रत्येक होलसेल दुकानदाराने स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जे दुकानदार या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन, तीन दिवसात यात सुधारणा झाली नाही तर संबधींत दुकानादारांच्या विरोधीत गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.