डोंबिवलीत दुकाने बंद : रिक्षांची तुरळक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:35+5:302021-03-30T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शनिवार, रविवारी कोविड नियमानुसार व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शनिवार, रविवारी कोविड नियमानुसार व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. मात्र, त्याला व्यापाऱ्यांनी विरोध करून निषेध आंदोलन केले. त्यामुळे रविवारी दुकाने सुरू ठेवून सोमवारी बंद करण्याचे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानुसार सोमवारी धुळवडीच्या दिवशी व्यापाऱ्यांनी शहरभर दुकाने बंद ठेवून महापालिकेला पूर्ण सहकार्य केले.
कापड, भाजीबाजार यांसह सगळीकडे दुकाने, व्यापार बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यातील लॉकडाऊनसारखी स्थिती असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
अत्यावश्यक सेवेतील दुकानांतही फारसा प्रतिसाद नसल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते.
इंदिरा गांधी चौक, रामनगर तसेच पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांची तुरळक वाहतूक सुरू होती, मात्र, अल्प प्रतिसादामुळे बहुतांशी रिक्षाचालकांनी व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले.
कायदा सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी इंदिरा गांधी चौकात, स्टेशन परिसर, पश्चिमेला मोक्याच्या ठिकाणी तसेच घरडा सर्कल व अन्य ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. एरव्ही गजबजाट असलेल्या स्टेशन परिसरात शुकशुकाट दिसून आला.
* रेल्वे स्थानकातून पहाटेपासून सकाळी ८.३० पर्यंत अत्यावश्यक सेवेतील काही कर्मचारी मुंबईच्या दिशेने प्रवासाला गेले. परंतु, त्यानंतर मात्र लोकल रिकाम्याच धावल्याचे निदर्शनास आले.
* हॉटेल, स्नॅक्स बार खुले होते. परंतु पार्सलला फारशी मागणी नव्हती. त्यामुळे सकाळच्या वेळेतदेखील त्या व्यासायिकांचा हिरमोड झाला. संध्याकाळी व्यवसाय होईल, अशी अपेक्षा त्यांना होती.
* बहुतांश ठिकाणी नागरिकांनी घरगुती स्वरूपात धुळवड खेळली. काहींनी सोसायटीत उत्सव साजरा केला. पाण्याची नासाडी होऊ नये, याची अनेकांनी काळजी घेऊन गच्चीत, सोसायटी आवारात रंग खेळला.
-----/---/----------