कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने ५ जूनपासून होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:06 AM2020-06-03T00:06:59+5:302020-06-03T00:07:04+5:30
केडीएमसी हद्दीत मुभा : सम-विषम तारखेचा नियम
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने ५ जूनपासून सम-विषम तारखेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान सुरू करण्यास मुभा दिली जाणार आहे. मात्र, मॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू करता येणार नाही. दुकाने सुरू करण्यासाठी दुकानदारांना पोलीस व महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने नागरिकांना पावसाळी चपला, छत्री, ताडपत्री, कपड्यांची खरेदी करायची आहे. ५ जूनपासून दुकाने सुरू होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, कपड्यांच्या दुकानात ग्राहकांना कपड्यांची ट्रायल घेता येणार नाही. ग्राहकांनी खरेदीसाठी जाताना पायी अथवा सायकलद्वारे जावे. त्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहने वापरू नयेत. ग्राहकांसाठी जमिनीवर मार्किंग करणे, टोकन पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असेल. कंटेनमेंट झोनबाहेरही केशकर्तनालये, स्पा आणि व्यायाम शाळा सुरू करता येणार नाहीत.
नागरिकांना व्यायाम, खेळ, कसरतींसाठी सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत मुभा आहे. मात्र, दूरवरच्या मैदानात कसरत, व्यायाम व खेळाचा सराव करता येणार नाही. गाडीच्या दुरुस्तीसाठी गॅरेज व वर्कशॉपची अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. प्लंबर, इलेक्ट्रीशयन, पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना नियम पाळून काम करता येईल. अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा व टॅक्सींचा वापर करता येऊ शकतो. मात्र, चालक व दोन प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. सर्व खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुरू करता येतील. घरपोच सेवा देणारी हॉटेल्स सुरू करता येतील. ज्या बांधकाम व्यावसायिकांना लॉकडाउनपूर्वी बांधकाम परवानगी दिली आहे, त्यांनी बाहेरचे मजूर न घेता त्यांचा बांधकाम व्यवसाय सुरू करता येईल. बुधवारपासून त्यासाठी परवानगी दिली जाईल.
कंटेनमेंट झोनमध्ये काय असेल?
कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. मात्र, दुकानदारांना काउंरटवर विक्री न करता ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी लागेल. ज्या घरात अथवा इमारतीत कोरोना रुग्ण आढळला असेल, त्या ठिकाणापासून १०० मीटरच्या अंतरात कंटेनमेंट झोन असेल.
विवाह, अंत्यविधीसाठीही नियम निश्चित
विवाह सोहळ्यास ५० व्यक्तींनाच तर, अंत्यविधीला २० पेक्षा कमी व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. कारखान्यांतून व दुकानांतून कामगार सोडताना एकाच वेळी सोडून गर्दी होणार नाही, याची काळजी आस्थापनांना घ्यावी लागणार आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षांखालील मुलांना वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास मनाई आहे.