आपलं पर्यावरण चित्रपट महोत्सवात ६० दर्जेदार लघूचित्रपट पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:30 PM2018-06-02T15:30:02+5:302018-06-02T15:30:02+5:30
पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.
ठाणे: सर्व पर्यावरणप्रेमींच्यादृष्टीने आवडीच्या आणि माहितीपूर्ण अशा आपलं पर्यावरण” या चित्रपट महोत्सवास आजपासून येथील टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात ५ जून पर्यंत ६० विविध पर्यावरणविषयक लघु चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ, वन विभाग, ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून आज पर्यावरण दक्षता मंडळासारख्या सामाजिक संस्था या पर्यावरणासाठी इतके भरीव योगदान देत असल्याबद्धल जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी गौरावोद्गार काढले. जिल्ह्यात कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून गेल्या दोन तीन वर्षांत जिल्ह्यात २३ लाख झाडे लावण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी बोलतांना पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर यांनी पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले. जैवविविधता, पर्यावरण संरक्षण यासाठी या चित्रपटांचा मोठा हातभार लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जून महिन्याच्या “आपलं पर्यावरण” या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी नाबार्डचे निवृत्त मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक मेथील, सुजय पत्की, डॉ संजय जोशी यांचीही उपस्थिती होती.
५ जूनपर्यंत अनेक कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. ३ जून रोजी मानपाडा निसर्ग परिचय केंद्रास भेट, ४ जून रोजी कचराळी व सिद्धेश्वर तलावास भेट, ५ जून रोजी मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष एड शिरीष देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच तीनही दिवस दुपारच्या सत्रांमध्ये टाऊन हॉल येथे लघु चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.