उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर!
By सदानंद नाईक | Published: September 28, 2024 05:40 PM2024-09-28T17:40:07+5:302024-09-28T17:40:44+5:30
रुग्ण औषधांविना, ४ महिन्यापासून औषध अनुदान नाही; आमदार आयलानीचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र
सदानंद नाईक, उल्हासनगर: शासनच्या अनुदाना अभावी मध्यवर्ती रूग्णालयसह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झाला. त्यामुळे रुग्णांवर विना औषध राहण्याची वेळ आली. स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास व ऑक्सिजन, नायट्रेट व स्पिरिट रिफिलास नकार दिल्यास, मोठा अनर्थ ओढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात लाडक्या बहिणी व इतर योजनेवर कोट्यवधींची उधळण सुरू असताना दुसरीकडे औषधीच्या तुटवाड्यामुळे गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉ अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रूग्णालय ठाणे प्रमुख डॉ कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला ठाणे जिल्हातील सर्वच शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली. सामान्य जिल्हा रूग्णालय ठाणेसाठी १२ कोटी तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी २ कोटी तसेच औषध थकबाकीसाठी ५५ लाखाची मागणी केली. स्थानिक औषध दुकानदाराच्या थकबाकीबाबतची माहिती दिली.
मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० रुग्णांची नोंद असून आंतररुग्णांची संख्याही क्षमते पेक्षा जास्त आहे. शासनाच्या पूर्णतः मोफत उपचार धोरणामुळे शासकीय रुग्णालयात रुग्ण संख्येत वाढ झाली. मात्र त्याप्रमाणात आरोग्य विभागाकडून औषध पुरवठा होत नसून गेल्या ४ महिन्यापासून स्थानिक औषध खरेदीसाठी अनुदान नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषध पुरवठा ९० टक्के कमी झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानाकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी ४० लाखावर गेली. त्यामध्ये ९ लाखाचे ऑक्सिजन, नायट्रेस व स्पिरिट फिलींग बिल आहे. दरम्यान दुकानदारांनी थकबाकीसाठी रूग्णालयाकडे तगादा लावला असून दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन, ऑक्सिजन, नायट्रेस, स्पिरिट रिफिल करण्यास मनाई केल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना आमदारांचे पत्र
मध्यवर्ती रुग्णालयात औषध तुटवाड्यामुळे अनर्थ घडल्यास, त्याला डॉक्टर जबाबदार नाही. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी आमदार कुमार आयलानी यांना दिली. त्यानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना रुग्णालयातील परिस्थितीची माहिती देऊन औषध व अनुदानाची मागणी केली.
रुग्णालयाच्या उत्पन्नावर गदा
रुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केश पेपरमधून महिन्याला ५ ते ६ लाखाचे उत्पन्न मिळत होते. त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती.