माणसांशी माणसासारखे वागावे हे सांगावं लागणारी ही शेवटची पिढी ठरावी- संदीप पाठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 03:25 PM2020-12-19T15:25:44+5:302020-12-19T15:27:37+5:30
ठाण्यातील विविध लोकवस्तीतील मुलांनी या कार्यक्रमात आपला कलाविष्कार सादर केला.
ठाणे : वंचितांच्या रंगमंचावरील लोकवस्तीतील एकलव्य मुलांनी सलोखा या विषयावर जे विचार त्यांच्या कलाविष्कारातून व्यक्त केले, त्यातून त्यांच्या विचारांची दिशा दिसते. धर्म, जाती, वर्ग अशा भेदांबद्दलचा मुलांचा विरोध स्पष्टपणे समोर येतो. समाजातील द्वेष वाढवणार्या प्रवृत्तींना या मुलांची पिढी धुडकावून लावेल आणि भेदाभेद नष्ट होऊन माणसांनी माणसांशी माणसासारखे वागावे हे सांगावं लागणारी ही शेवटची पिढी ठरेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाट्य, सिने अभिनेता संदीप पाठक यांनी समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमंच आयोजित मतकरी स्मृती मालेच्या सहाव्या कार्यक्रमात बोलताना केले.
ते पुढे असेही म्हणाले की, रत्नाकर मतकरींच्या लिखाणाचा अनेक पदरी आवाका किती मोठा होता हे जाणून होतो पण त्यांच्या सामाजिक जाणिवेचा मूर्तीमंत आविष्कार आज या वंचितांच्या रंगमंचाच्या रूपाने कळून आला. या मुलांशी संवाद साधायला, त्यांच्यासाठी काही सादर करायला मला खूप आवडेल असेही त्यांनी आदराने नमूद केले. रत्नाकर मतकरींच्या ‘भाऊ’ या हिंदू मुस्लिम दंगलींच्या पार्श्वभूमीवर माणुसकीचा धर्म निभावण्याचे महत्व प्रभावीपणे विशद करणार्या, खास किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या गाजलेल्या कथेचे तितकेच प्रभावी वाचन संदीप पाठक यांनी यावेळी केले.
दिवंगत जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना आदरांजली म्हणून त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वंचितांचा रंगमंचाकडुन प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला लोकवस्तीतील मुलांच्या कलाविष्कारांचा मतकरी स्मृती माला हा कार्यक्रम सादर केला जातो. काल या मालेच्या सहाव्या पुष्पात ईद दीपावली नाताळ संमेलन साजरे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम होत्या. प्रतिभा मतकरी, अभिनेत्री सुप्रिया विनोद, संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य कार्यकर्ता प्रविण खैरालिया यांनी आणि सूत्रसंचालन एकलव्य कार्यकर्ती अक्षता दंडवते हिने केले.
इस्लाम, ख्रिश्चन धर्म आणि संविधांनावर विचारवंतांचे मनोगत
संविधान अभ्यासक ऍड. निलेश खानविलकर यांनी या प्रसंगी संविधांनातील धर्मनिरपेक्षता विशद केली. ते म्हणाले, आपल्या देशाला अधिकृत धर्म नाही आणि सर्वधर्मसमभाव म्हणजे आपल्या देशात व्यक्तिला कुठल्याही धर्माचे पालन करण्याचे धर्म स्वातंत्र्य आहे. व्यक्तीसाठी धर्म आहे, धर्मासाठी व्यक्ती नाही. धर्माच्या नावाखाली व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी संविधानाने तयार केलेले कायदे घेतात, हे त्यांनी उदाहरणाने पटवून दिले.
गुलशन ई इस्लाम या साकीनाक्याच्या शाळेचे प्राचार्य आणि इस्लाम धर्माचे अभ्यासक हुसेन माणियार यांनी इस्लाम धर्मातील सहिष्णुतेचे महत्व विशद केले. सेंट जॉन बाप्तिस्त चर्चचे फादर गॅल्स्टन गोन्साल्विज यांनी ख्रिश्चन धर्मात येशू ख्रिस्ताने दिलेली प्रेम, करुणा, क्षमाशीलता याची शिकवण म्हणजेच सलोखा अशी सुंदर मांडणी करून, आजच्या काळातील धर्म, जाती, प्रांत, भाषा, वर्ग यातील भेदाभेद दूर करून एकत्रितपणे समाजाला प्रगतिपथावर नेण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारांचे कौतुक करून धर्मा - धर्मातील, जाती – जातीतील भेद दूर करून ही पुढची पिढी समाजात सलोखा निर्माण करतील अशी खात्री व्यक्त केली.
लोकवस्तीतील एकलव्यांचे सलोखा विषयावर प्रभावी सादरीकरण
ठाण्यातील विविध लोकवस्तीतील मुलांनी या कार्यक्रमात आपला कलाविष्कार सादर केला. सावरकर नगर च्या वैष्णवी करांडे, स्मिता मोरे, प्रिय सात्वी, मोनिका लोंढे, प्राची डांगे, मंगम्मा धनगर, कांचन या मुलींनी, पाडू चला रे भिंत मध्ये आड येणारी हे गाणं आणि शेजार धर्माचे महत्व सांगणारे नाटक सादर केलं. मानपाडा येथील दीपक वाडेकर याने आपल्या काव्यमय मनोगतातून सलोखाच्या अर्थाचा एक वेगळाच पैलू उलगडून दाखवला आणि एक विचारप्रवर्तक दृष्टीकोन दिला. ठाणे महानगर शाळा क्र. १८ च्या मुलींनी सीमा श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक सलोख्यावर नाटक सादर केलं.
रमाबाई आंबेडकर वस्तीतील ओंकार गरड याने सावित्री बाई फुले यांच्या बरोबरीने स्त्री शिक्षणाचे काम करणार्या फातिमा शेख यांच्या बद्दलच्या लेखाचे अभिवाचन करून दलित – मुस्लिम सलोख्यावर भाष्य केले. माजिवडा येथील सई मोहिते हिने ‘हीच आमुची प्रार्थना ...’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. माजिवडा येथील मुलांनी पंकज गुरव आणि शहनाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम ऐक्यावर धार्मिक सलोखा हे नाटक सादर केले. यात ओंकार जंगम, शुभम कांबळे, नयन दंडवते, शिफा, अक्षता दंडवते या मुलांनी भाग घेतला. राबोडी फ्रेंड सर्कल उर्दू विद्यालय शाळेत १० वीत शिकणार्या अफरीन महफूज चौधरी या मुलीने इस्लाम धर्मातील मानव अधिकार यावर आपले मनोगत व्यक्त केले.
किसन नगर विभागातील सानिका पाटील, आदिती नांदोस्कर, तेजल बोबडे, आदर्श उबाळे, गौरव हजारे, सुभाष देवकर यांनी देशातील जातीय सलोखा: महत्व, गरज आणि आवश्यकता या बी. राजेश मीरा यानी लिहीलेल्या लेखातील काही भागाचे प्रभावी अभिवाचन केले. त्यांना विश्वनाथ चांदोरकर यांनी मार्गदर्शन केले. कळवा येथील राहुल आंबोरे, लखन आंबोरे, यश, साहिल गायकवाड, चेतन मोरे, वैष्णवी करांडे, प्राची डांगे, मंगम्मा धनगर, अजय भोसले, दर्शन पडवळ यांनी विविध धर्मियांची एकजूट हीच खरी भारतीयता यावर सुंदर मूकनाट्य सादर केलं. या नाटकाची संकल्पना अजय भोसले यांची होती. माजिवडा येथील आर्य निगुड हिने वडील - मुलीच्या मैत्रि संबंधात पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यातला संवाद एकपात्री प्रयोगातून सादर केला. झूमवर सादर झालेल्या या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सुजय मोरे आणि प्रकेत ठाकूर यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या लतिका सु. मो., मीनल उत्तूरकर, सुनील दिवेकर, आतेश शिंदे आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेच्या फेसबुकवर हजारो रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.