काळानुरुप शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे अन्यथा डिजीटल युगात विद्यार्थी कसे वावरणार? : प्रदीप ढवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:33 PM2019-09-26T17:33:37+5:302019-09-26T19:09:49+5:30
प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी आपला शैक्षणिक प्रवास अत्रे कट्ट्यावर उलगडताना आजच्या शिक्षणपद्धतीत बदल करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ठाणे: देशाच्या अर्थसंकल्पात दीड लाख कोटी उच्च शिक्षणावर खर्च केला जातो. यात आज युवा पिढीकडून अपेक्षा केल्या जातात पण त्यांना हवे तसे शिक्षण दिले जात नाही अशी खंत लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केली. काळानुरुप शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे अन्यथा डिजीटल युगात विद्यार्थी कसे वावरणार? पुढील आठ ते दहा वर्षात हाताला आणि डोक्याला काही काम राहणार नाही. त्यामुळे शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मानसीकतेचाही विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे अत्रे कट्ट्यावर लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांचे ‘माझा शैक्षणिक प्रवास’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
शिक्षक म्हणून त्यांच्यावर संस्कार कसे घडले यार सांगताना ते म्हणाले, मी डॉ. बेडेकर विद्या मंदिर या शाळेत शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांना पाहतच मनावर आपसूकच संस्कार होत गेले. या संस्कारामुळेच मी वाणिज्य शाखेचा प्राध्यापक असलो तरी मला साहित्य आणि नाटकाची आवड होती. ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागण्याआधी मी बिल्डर होतो. आज मी याच क्षेत्रात असतो तर ठाण्यातील नामवंत बिल्डरांमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असतो. पण मला प्राध्यापकच व्हायचे होते. १९८८ साली ज्ञानसाधना महाविद्यालयात मला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. आपल्या पैसा अमाप असला तरी समाधान शोधता आले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी दहावीची परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यास सायकल देण्याचे आश्वासन दिले. सायकलसाठी मी दहावीची परिक्षा उत्तीर्ण झालो आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पुर्ण केले. मी सायकल मिळाल्यार त्या सायकलने १९८५-८६ साली ठाणे ते गोवा प्रवास केला हे उदाहरण देताना प्रा. ढवळ म्हणाले की, माणसाने ठरवले तर सर्व शक्य आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयात शिकवत असताना शाम फडके, प्रज्ञा लोखंडे, प्रविण दवणे, अशोक बागवे या साहित्य क्षेत्रातील मंडळींसोबत काम करण्याची संधी मिळाली. शाम फडके आणि एस. व्ही. कुलकर्णी यांनी आमच्यावर संस्कार केले. मनाला भावनेकडे घेऊन जाणारे शिक्षण मला तिथे अनुभवता आले. परंतू आता शिक्षणाची व्याख्या बदलली आहे. या देशात टॅलेण्ट आहे पण संधी मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे चार टप्पे आहेत ते म्हणजे अध्यापन, संशोधन, इंडस्ट्रीमधील इनपुट - आऊटपूट आणि ज्ञानाचा प्रसार. अध्यापन आपल्याकडे होते पण संशोधन, इंडस्ट्रीमधील इनपुट - आऊटपूट आणि ज्ञानाचा प्रसार याचा मात्र आपल्याकडे अभाव आहे. पाठ करा आणि लिहा अशी शिक्षणपद्धती असल्याने इथे ज्ञानाची तहान कुठे आहे? विद्यार्थ्यांना ज्ञान कसे दिले जाईल याचा विचार व्हावा असेही ते म्हणाले. प्रा. ढवळ यांनी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली.