मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:24+5:302021-09-02T05:27:24+5:30

स्टार ११२६ अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मंदिरे उघडावीत, यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. मंदिरे उघडायला ...

Should temples be opened; Which party thinks so? | मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?

googlenewsNext

स्टार ११२६

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मंदिरे उघडावीत, यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. मंदिरे उघडायला हवीत काय, यावर सर्व राजकीय पक्षांचे मत काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. त्यावर आघाडीसह विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी मंदिरे उघडायलाच हवीत, असे मत व्यक्त केले. पण कोरोनाचे संकट अजून पूर्ण गेलेले नाही. त्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असा पवित्रा आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतला. तर, अल्पसंख्याकांची पाठराखण आणि हिंदू सणांवर टाच, अशी भूमिका सरकारची असल्याने त्याचा निषेध करत असल्याचे पवित्रा भाजपने घेतला आहे. दुसरीकडे मंदिरे उघडा अन्यथा पक्षादेश येताच घंटानाद करणार, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

------------

सणांनाही परवानगी द्या

दीड वर्ष झाले अद्याप सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. हिंदू सणांवर आक्षेप घेऊन काय साध्य होणार आहे. संघटन, एकत्रीकरण, विविधता मे एकता टिकवून धरण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागण्यासाठी मंदिरेच नव्हे, तर सर्व सणांना राज्य सरकारने परवानगी द्यायला हवीच.

- शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, भाजप

---------

राजकारण करू नये. मंदिर उघडतीलच, सगळ्या भक्तांनी थोडा धीर धरावा. कोरोना संकट कमी होत आहे, हळूहळू टास्क फोर्सही मार्गदर्शन करेल. त्यानुसार राज्य शासन मंदिर उघडण्याचा निश्चितच निर्णय घेईल. त्या विषयाचे राजकारण कोणी करू नका, सरकारची भूमिका समजून घ्यायला हवी.

- संतोष केणे, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी

--------

शासनाचे सावधपणे काम सुरू आहे

मंदिर उघडायला हवीत, असे मलाही वाटते, परंतु कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. टास्क फोर्स आणि तज्ज्ञ त्यावर कार्यरत आहेतच. शासन खूप सावधपणे काम करत आहे, नागरिकही त्यावर खूप समाधानी आहेत. आता हादेखील निर्णय लवकर येईलच.

- सुधीर वंडार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हाध्यक्ष

------------

राज्य शासनाची चोख कार्यवाही

राज्य शासन हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वावर काम करत आहे. त्यानुसार त्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सावध राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनही चोख कार्यवाही करत आहे.

- राजेश मोरे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख

---------

घंटानाद आंदोलन करणार

मंदिरे उघडलीच पाहिजेत, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आला की, आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहोत.

- मनोज घरत, मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली

-----------------------

शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

मंदिरे उघडायला हवीत, यासंदर्भात आमच्या विश्वस्त मंडळींनी मागच्या महिन्यात एकत्र बसून त्याबाबत विचार केला. पण राज्य शासनाच्या आदेशाची आम्ही अद्याप वाट बघत आहोत. भक्तांना मंदिर कधी उघडणार, याबाबत असंख्य प्रश्नांना उत्तर तरी काय द्यायची हा मोठा पेच आहे.

- राहुल दामले, अध्यक्ष, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली

-------------------

Web Title: Should temples be opened; Which party thinks so?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.