केळकरांचे ओझे लेलेंच्या खांद्यावर
By admin | Published: January 19, 2016 02:12 AM2016-01-19T02:12:57+5:302016-01-19T02:12:57+5:30
पक्षबांधणी, शिवसेनेला आक्रमकपणे विरोध आणि अंतर्गत गटातटांना एकत्र करण्याचे आव्हान आ वासून उभे असतानाच आता तत्कालीन शहराध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या
ठाणे : पक्षबांधणी, शिवसेनेला आक्रमकपणे विरोध आणि अंतर्गत गटातटांना एकत्र करण्याचे आव्हान आ वासून उभे असतानाच आता तत्कालीन शहराध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या काळात बंद राहिलेले भाजपाचे शहर कार्यालय सुरू करण्याचे ओझेही नवनियुक्त अध्यक्ष संदीप लेले यांच्या खांद्यावर आले आहे. पक्षाच्या कार्यालयाची थकबाकी आणि दोन कर्मचाऱ्यांचा पगार देणे शक्य नसल्याने हे कार्यालय सध्या बंद आहे. थकबाकी चुकवून हे कार्यालय नव्याने सुरू करत किमान कार्यकर्त्यांचा राबता सुरू करण्यासाठी नव्या अध्यक्षांनी कंबर कसली आहे.
गेल्या आठवड्यात भाजपाच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा संदीप लेले यांची नियुक्ती झाली. पक्षातील विविध गटातटांतील राजकारणावर अंकुश ठेवण्याबरोबर पक्षबांधणीचे आणि त्याच वेळी आक्रमकपणे आंदोलने उभी करत शिवसेनेची कोंडी करण्याचे आव्हान या अध्यक्षांपुढे उभे ठाकले आहे.
या आव्हानांना हात घालण्यापूर्वीच त्यांना गेल्या सात महिन्यांपासून खोपट येथील बंद असलेले शहर कार्यालय पुन्हा सुरू करण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शहराध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांच्या कार्यकाळात दोन ते तीन वेळाच या ठिकाणी बैठका झाल्या होत्या. परंतु, राज्यात सत्ता असूनही त्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा पगार देणे शक्य नसल्याने त्यांना तेथून सुरुवातीला निरोप देण्यात आला. इतर खर्चांचा विचार करता नंतरच्या काळात हे कार्यालय चालविणे शक्य नसल्याने गेले सात महिने त्याला कुलूप लागले होते. हा खर्च कोण करणार, हा कळीचा मुद्दा त्यात होता. त्यामुळेच सारे शांत होते. आता या कार्यालयाची थकबाकी लाखोंच्या घरात गेल्याने ती कोण भरणार, असा लाखमोलाचा सवाल मात्र आता उपस्थित झाला आहे.
तोवर रविवारपासून पुन्हा या कार्यालयातील जळमटे काढून धूळ झटकण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते. लवकरच नव्या दिमाखात हे कार्यालय पुन्हा सुरू होईल, असा विश्वास शहर भाजपाने व्यक्त केला आहे.