कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

By अजित मांडके | Published: May 5, 2023 05:49 PM2023-05-05T17:49:45+5:302023-05-05T17:49:56+5:30

महापालिका आयुक्तांनी उचलले पाऊल, कळव्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरण

Show cause notice issued to Assistant Commissioner of Kalwa Ward Committee | कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत जयभरात मैदानाच्या शेजारी असलेली आठ मजली अनाधिकृत इमारत ही अवघ्या चार महिन्यात उभी राहिली असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतरही कळवा प्रभाग समितीकडून या इमारतीवर कारवाई न झाल्याने तसेच कळव्यात वाढत असलेल्या अनाधिकृत बांधकामांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणी त्यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये या बाबतचा खुलासा तीन दिवसात करण्यात यावा असेही त्यांनी यात नमुद केले आहे.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात आजही अनाधिकृत बांधकामांचे इमले उभारले जात असल्याचे दिसून आले आहे. अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात वारंवार तक्रारी केल्यानंतरही केवळ धातुरमातुर कारवाई होत असल्याचेही दिसून आले आहे. जय भारत मैदानाशेजारी आठ मजली अनधिकृत इमारतींचे काम सुरु असून सात मजल्यांपर्यंत ही इमारत तयार देखील झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार महिन्यात ही अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. त्यातही या इमारतीवर पालिकेने यापूर्वी देखील कारवाईचा दिखावा केला होता. परंतु त्यानंतरही ही इमारत पुन्हा उभी राहिल्याचे दिसून आले आहे.  मात्र एकदा कारवाई होऊनही तसेच यासंदभार्तील वृत्त प्रसिद्ध होऊनही निर्ढावलेल्या स्थानिक विकासांकडून अनधिकृत इमले चढवणे सुरूच असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे केवळ थातुर मातुर कारवाई करण्यापेक्षा इमारत अनधिकृत आहे हे माहित असून प्रशासनाकडून इमारत जमीनदोस्त केली जात नसल्याने नेमके प्रशासन कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे.

दरम्यान या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या कळवा प्रभाग समितीत कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अनाधिकृत बांधकाम केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचेही या नोटीसीत आयुक्तांनी म्हंटले आहे. परंतु या बांधकामांवर वेळीच कारवाई न झाल्याने तथा दिखाऊ व जुजबी कारवाई होत असल्याने अप्रत्यक्षरित्या आपण अनाधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आपणा विरोधात शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई का करु नये असा सवाल उपस्थित करीत तीन दिवसात याचा खुलासा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खुलासा केला गेला नाही तर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई केली जाईल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अनाधिकृत बांधकामांना संरक्षण देणाºया सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, समीर जाधव आणि विद्यमान सुबोध ठाणेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने पुन्हा एकदा उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संजय घाडीगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Show cause notice issued to Assistant Commissioner of Kalwa Ward Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.